मुंबई – 11 मार्च रोजी पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी केली आहे. यावेळी ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तब्बल साडे नऊ तास ही छापेमारी करण्यात आली होती.
गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला असून, आता मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. यापूर्वी 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते.
दरम्यान, ईडीने समन्स बजावले असून हसन मुश्रीफ काल ईडी चौकशीला सामोरे गेले. यावेळी त्यांची तब्बल आठ तास चौकशी झाली. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ ईडी कार्यालयाबाहेर पडले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ईडीने दुपारी साडेबारा वाजता मला समन्स दिले होते.
त्यामुळे साडेबारा वाजेपासून ते आतापर्यंत त्यांनी जे प्रश्नांची सर्व उत्तरे देत मी त्यांना सहकार्य केलं. मला त्यांनी आता पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. मी काही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य केलं..’ अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.