पाण्यासाठी महिलांची भटकंती

साताऱ्याच्या पश्‍चिम भागात पाणीप्रश्‍न बिकट

सातारा – सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील गावांमध्ये दिवसेंदिवस पाणीप्रश्‍न बिकट होत चालला आहे. पश्‍चिम भागात असणाऱ्या जळकेवाडीसह परिसरातील गावांमधील महिलांना ऐन उन्हातान्हात कुटुंबाची तहान भागविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगर कपारीतून वाहनाऱ्या टिचभर झऱ्यांमधून येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होणार असून हे झरेदेखील आटण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घेऊन पश्‍चिम भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पारा 40 अंशापर्यत येत आहे. दुष्काळ म्हटल की माण-खटाव या दोन तालुक्‍यांचाच उल्लेख केला जातो. मात्र, कोरेगाव, वाई, जावली, सातारा, पाटणसह इतर तालुक्‍याच्याही विविध भागांमध्ये नेहमीच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असते. मात्र, त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडूनही नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. यावर्षीही जिल्ह्याच्या विविध भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे.

सातारा शहराच्या पश्‍चिम भागात शहराला मुबलक पाणीपुरवठा करणारा कास तलाव असला तरीही या भागातील जळकेवाडीसह इतरही अनेक गावांमधील ग्रामस्थांना विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र, पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या या ग्रामीण जनतेच्या पाणीप्रश्‍नावर ना लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न होताना दिसत आहेत ना प्रशासनाकडून. त्यामुळे या जनतेने दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या या भागातील महिला डोंगर कपारीतून वाहनाऱ्या लहानशा झऱ्यांमधून येणाऱ्या पाण्यातून आपल्या कुटुंबाची तहान भागवत आहेत. मात्र, असाच कडक उन्हाळा राहिल्यास हे झरेदेखील फारकाळ टिकणार नाहीत. त्यामुळे वेळीच प्रशासनाने याची दखल घेऊन जळकेवाडीसह परिसरातील ज्या ज्या गावांमध्ये पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यांच्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज निर्माण झाले आहे. अन्यथा येथील लोकांवर केवळ पाण्यासाठी आपले गाव सोडण्याची वेळ येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.