गर्दीमुळे महामार्ग थबकला

मुलांच्या उन्हाळी अन्‌ सलग सुट्ट्यांमुळे नोकरदारांची पावले गावाच्या दिशेने 

सातारा – शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. विशेषत: महामार्गावरील खेडशिवार, तासवडे तसेच आनेवाडी टोलनाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होती. याशिवाय खंबाटकी आणि लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याने वाहनधारकांसह प्रवाशांचा दोन-अडीच तासांचा प्रवास वाढला. गर्दीमुळे वाहनधारक मोठ्या प्रमाणात हैराण झाले होते.

सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने तसेच ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरु झाल्याने पुण्या-मुंबईला नोकरीनिमित्त असणारा नोकरदार वर्ग गावाकडे प्रस्थान करु लागला आहे. त्यातच शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांचा मुहूर्त आयताच मिळाल्याने शुक्रवारी पुण्या-मुंबईहून सातारा, कोल्हापूरकडे येणाऱ्या सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, ट्रॅव्हल्सना मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

एरव्ही अडीचशे ते तीनशे रुपये तिकाटासाठी द्यावे लागत असताना शुक्रवारी मात्र प्रवाशांना सातारा-मुंबई प्रवासासाठी 500 ते सातशे रुपये मोजावे लागले. दरम्यान, दुप्पट तिकिट काढूनही महामार्गावर वाहनांची वाढलेल्या वर्दळीमुळे घाटरस्त्यांवर जागोजागी ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांना नेहमीपेक्षा दोन तीन तास उशिर सहन करावा लागला. याशिवाय महामार्गावरील टोलनाक्‍यांवरही मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने तिथेही तासन्‌तास ताटकळावे लागले.

दरम्यान, जेव्हा जेव्हा सलग सुट्ट्या असतात तेव्हा तेव्हा टोलनाक्‍यांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्याच असतात. त्यामुळे या टोलनाक्‍याच्या वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे वाहनधारकांसह प्रवासीवर्ग पुरता वैतागला आहे. त्यामुळे टोल व्यवस्थापनाने वारंवार होत असलेल्या या कोंडीवर ठोस उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. कोंडीमुळे अनेकदा टोल कर्मचारी तसेच वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत असतात. योग्य उपाययोजना केल्या टोलनाक्‍यावरील वादावादीचे प्रसंगही टाळता येतील अशा भावना प्रवशांमधून व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.