स्त्री आरोग्य : मातेचे दूध म्हणजे अमृतच

डिलिव्हरीनंतर प्रोलॅक्‍टीन आणि ऑक्‍सिटोसीन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे दूध तयार होते. तसेच आईला आपल्या अपत्याबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा, बाळाला पाहिल्यामुळे, जवळ घेतल्यामुळे, बाळाचा आवाज ऐकल्यामुळे, तसेच बाळाच्या आठवणीनेसुद्धा आणि बाळास आईचे स्तन चोखावयास दिल्याने आईला पान्हा फुटतो आणि दूध येऊ लागते. डिलिव्हरीनंतर पहिले तीन-चार दिवसांत जे दूध येते त्यास कोलोस्ट्रम किंवा चीक असे म्हणतात. या चिकामध्ये प्रतिकारशक्‍तीसाठी आवश्‍यक असे घटक असतात. तसेच या चिकाचा पचनमार्गात एक थर किंवा आवरण बनतो. त्यामुळे जोपर्यंत लहान बाळांची प्रतिकारशक्‍ती विकसित होत नाही तोपर्यंत हा थर त्यांना संरक्षण देतो. या चिकाच्या थरामुळे किंवा आवरणामुळे पोट चांगल्याप्रकारे साफ होते.

त्यामुळे सुरुवातीची जी हिरवट रंगाची शी आहे ती बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यामुळे काविळ होण्याचा धोका राहात नाही. आईच्या दुधात प्रोटीन्स, कार्बोहाड्रेट्‌स, फॅट्‌स, मिनरल पाणी असे सर्व घटक असतात. त्यामुळे बाळास सुरुवातीला म्हणजे जन्मानंतर पहिले चार ते सहा महिन्यांत आईचे दूध सोडून इतर कशाचीही गरज नसते. अगदी पाण्याचीसुद्धा नाही. जेव्हा आई बाळास दूध पाजण्यास घेते तेव्हा सुरुवातीला दूध अगदी पातळ म्हणजे पाण्यासारखे येते. नंतर त्याच बाजूला दूध घट्ट येते. पहिल्या पातळ दुधामुळे बाळाची तहान भागते, बाळाचे पोषण होते तर नंतरच्या घट्ट दुधामुळे बाळाचे पोट भरते. त्यामुळे बाळास एकावेळी एकाच बाजूस पूर्णपणे पाजावे. नंतरच्या वेळीस दुसऱ्या बाजूस पाजावे.

आईने बाळास दूध कसे व किती काळ पाजावे?
डिलिव्हरीनंतर लगेचच 1 ते 2 तासात बाळाला अंगावरचे दूध पाजण्यास घ्यावे. यासाठी आईने प्रथमतः आपले हात आणि स्तनाग्रे पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. स्तनपान शक्‍यतो शांत आणि एकांत जागी बसून करावे. दूध पाजताना बाळाला हातावर अशाप्रकारे घ्यावे की बाळाचे डोके बाळाच्या पोटापेक्षा थोडे वरच्या बाजूस राहील. बाळाला स्तनाग्र तोंडात देण्यासाठी पुढे वाकू नये. त्यामुळे आईस पाठदुखी जाणवते. दूध पाजताना बाळाच्या तोंडात स्तनाग्राप्रमाणेच संपूर्ण काळा गोल द्यावा.

दूध पाजताना स्तनांचा दाब बाळाच्या नाकावर येत नाही ना याची काळजी घ्यावी. अन्यथा बाळास नाकाने श्‍वास घेता न आल्याने दूध पिता-पिता बाळ तोंडाने श्‍वास घेते. त्यामुळे बाळाच्या पोटात बऱ्याच प्रमाणात हवा जाऊन बाळास बेचैनी, पोटदुखी, गॅस जाणवतो. काही मातांना भरपूर दूध येते. बाळाने दूध पिण्यासाठी स्तन तोंडात घेतले की लगेचच एकाच वेळी भरपूर दूध तोंडात जमते. त्यामुळे एवढा मोठा घोट गिळताना बाळास त्रास होतो.

अशा वेळी आईने आपल्या तर्जनी आणि मधल्या बोटाने बाळाच्या ओठांच्या जरा वर स्तनास पकडून हलकासा दाब देऊन दुधाचा प्रवाह थोडा कमी करावा आणि जेव्हा बाळ व्यवस्थित पिऊ लागेल तेव्हा सोडून द्यावे. बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर पुन्हा मऊ कापडाने स्तनाग्रे स्वच्छ करावीत. दिवसातून 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ पाण्याने स्तनाग्रांची स्वच्छता करावी. स्तनाग्रांना चिरा पडू नयेत म्हणून त्यास तूप किंवा लोणी लावावे.

काही बाळांना दूध पिण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात तर काहींना 30 ते 40 मिनिटांपर्यंत देखील वेळ लागू शकतो. बाळांना सुरुवातीला दर दोन तासांनी दूध पिण्यास लागते. हळूहळू हा कालावधी 3 ते 4 तासांपर्यंत वाढतो असे असले तरी बाळांना जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध पिण्यास द्यावे.

बाळाला पुरेसे दूध मिळते का?
प्रत्येक आईला, आजीला ही शंका असतेच की आपल्या बाळाला दूध पुरत आहे ना? जर बाळ दूध पिल्यानंतर 2 तास रडत नसेल, बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत असेल, बाळ व्यवस्थित झोपत असेल, बाळाची वाढ सामान्य गतीने होत असेल तर बाळास पुरेसे दूध मिळत आहे से समजावे. पहिले चार महिने तर बाळास फक्त आईचेच दूध पाजावे. 4 ते 6 महिन्यांपासून बाळास पूरक आहार सुरू करावा. जसजसे बाळास दात येऊ लागतील तसतसे बाळाच्या आहाराचे प्रमाण वाढवावे आणि आईचं दूध क्रमाक्रमाने कमी करावे. साधारणतः बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत आईचं दूध थोड्याफार प्रमाणात द्यावे. नंतर बंद करावे.

दूध वाढविण्याचे उपाय –
श्रम, व्यायाम अजिबात करू नये. कशाचीही काळजी करू नये. आईने आनंदी, प्रसन्न राहावे, पुरेशी विश्रांती घ्यावी. आहारात तुपाचा वापर भरपूर करावा. शतावरी कल्प, अश्‍वगंधा, मुसळी, हळीव, खसखस, चारोळी, गोडांबी यांच्या खिली भरपूर दूध घालून त्यात साखर, वेलची, केशर, काजू, नदाम, पिस्ता घालून त्या खाव्यात. जर आई मांसाहार करीत असेल तर मटण, चिकन, तसेच मासे, खेकडे यांचे सूप प्यावे. आहारात ओला नारळ, दुधी भोपळा, भुईकोहळा, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, गव्हाचे पदार्थ भरपूर घ्यावीत. डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू खावेत. बडीशेप, मेथी हे दूध वाढविण्यासाठी विशेष उपयोगी आहेत.

दूध अतिप्रमाणात येणे/स्तन्यवृद्धी
बाळाला दूध पाजून झाल्यानंतर देखील जर आईच्या स्तनांमध्ये दूध शिल्लक राहात असेल किंवा छाती मोकळी होत नसेल तेव्हा त्यास स्तन्यवृद्धी किंवा दूध अतिप्रमाणात येणे असे म्हणतात. दूध येण्यासाठी म्हणून जो आहार सांगितलेला आहे त्याचा अतिरेक झाल्याने तसेच तयार होणारे दूध काही कारणाने बाळाकडून पुरेसे पिले गेले नाही तर दूध भरपूर होऊन स्तनांमध्ये साठू लागते. त्यामुळे स्तनांचा आकार वाढतो. स्तनांच्या ठिकाणी दुखू लागते. जडपणा, कठीणपणा जाणवू लागतो. स्पर्शदेखील सहन होत नाही इतपत दुखते. बारीक ताप, कणकणी जाणवू लागते. या अति दुधामुळे बाळास अजीर्ण होऊन उलटी, पोटदुखी, ताप, काणकणी, खराब वास असणारी जुलाब असे त्रास जाणवू लागतात.

उपाय अति प्रमाणात दूध येत असल्यास स्तनांमध्ये साठलेले दूध काढून टाकावे. स्तनांवर हळदीचा लेप लावावा. तांदूळ भिजवून वाटून आणि दुर्वा बारीक वाटून एकत्र करून त्याचा लेप स्तनावर लावावा. स्तन मोकळे न ठेवता योग्य आकाराची ब्रा वापरावी. छाती चोळू नये किंवा शेकू नये. अन्यथा त्यामध्ये पू निर्माण होण्याची शक्‍यता असते. आहारातून पातळ, गोड पदार्थ जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करावे. आहाराचे प्रमाण कमी करून आहार रुक्ष व हलका घ्यावा. विशेषतः ज्या बाळंतीण स्त्रीचे अपत्य जन्मानंतर मरण पावलेले आहे अशा बाळंतीणीस दूध बंद होण्यासाठी औषधे द्यावी लागतात.

दुधाची परीक्षा
आईच्या दुधाचे 5-6 थेंब किंवा धार पाण्यात टाकावेत ते पाण्यात टाकल्याबरोबर पाण्याबरोबर एकरूप व्हावे. पाण्याच्या तळाशी जाऊन बसू नये किंवा पाण्यावर तरंगू नये. पाण्यावर फेस किंवा बुडबुडे येऊ नये हे दूध धागेदार असू नये. दूध

स्वच्छ, पातळ आणि शीतल असावे. दुधाचा रंग शंखाप्रमाणे पांढरा असावा आणि चव गोड असावी.
योग्य पद्धतीने स्तनपान केल्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालमृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. बाळाचा बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने घडून येतो. वारंवार होणाऱ्या सर्दी, फ्लू, कानातील इन्फेक्‍शन, फुप्फुसातील इन्फेक्‍शन, दमा, त्वचाविकार, दातांच्या समस्या बालवयात येऊ शकणारे मधुमेह, रक्ताचा कॅन्सर यासारखे आजार किंवा नंतरच्या आयुष्यात येऊ शकणारी स्थुलता, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे, आतड्यांचा जंतुसंसगर्ग कोलायटीस यासारख्या सर्व आजारांची शक्‍यता स्तनपानामुळे बऱ्याच अंशी कमी होते. स्तनपानाचे फायदे बाळाबरोबरच आईलादेखील होतात.

गरोदरपणात वजनाबरोबरच गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो. डिलिव्हरीनंतर देखील पोट मोठं दिसत असते. रक्तस्राव सुरूच असतो. स्तनपानामुळे डिलिव्हरीनंतरचा रक्तस्राव लवकर आटोक्‍यात येतो. प्रेग्नंसीच्या आधी जेवढा गर्भाशयाचा आकार होता तेवढा परत डिलिव्हरीनंतर स्तनपानामुळे होतो. तसेच प्रेग्नंसीच्या पूर्वी जेवढे आईचे वजन होते तेवढे परत स्तनपानामुळे होण्यास मदत होते. तसेच स्तनाची गर्भाशयाचा किंवा स्त्री-बीज ग्रंथींचा कॅन्सरची शक्‍यता स्तनपानामुळे कमी होते. स्तनपानाच्या कालावधीमध्ये गर्भधारणेची शक्‍यतादेखील नगण्यच असते.

आईला येणारे दूध हे चांगल्या प्रतीचे असेल तरच स्तनपानाचे फायदे बाळास मिळतात. दुधाची परीक्षा कशी करावी? निर्दोष दुधाची लक्षणे कोणती हे जाणून घेऊ.

स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे ः
3-4 दिवस चिक दूध दिल्यावर हळूहळू आईला परिपक्व दूध उतरायला लागते.
चिक दूध बाळाच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी आवश्‍यक असते.
आईचे दूध एक प्रकारची लस असते.
बाळाच्या पचनक्रियेला साजेसं असते, त्यामुळे बाळासाठी पचायला हलके असते, निर्जंतूक असते. कारण आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते.
त्यामुळे बाळाला काविळ जुलाब इ. रोगांपासून संरक्षण मिळते. तसेच ऍलर्जी व दम्यापासून पण बचावते.
आईच्या दुधाचे तापमान योग्य असते.
भावी आयुष्यात स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या रोगापासून संरक्षण मिळते.
आईचे व बाळाचे प्रेमाचे नाते तयार होते, मजबूत होते व बाळाला सुरक्षित वाटते.
बाळाच्या पोषकतत्त्वांच्या आवश्‍यकतेनुसार स्तनपानाचे घटक कमी जास्त होत असतात. त्यामुळे बाळाला कसलीच कमतरता जाणवत नाही.
बाळाची चयनशक्ती वाढते व जबड्याची वाढ व्यवस्थित होते.
बाळ आजारी असलं तरी स्तनपान चालू ठेवता येते.

स्तनपानामुळे आईला होणारे फायदे ः
गरोदरपणात वाढलेले वजन कमी होते. बांधा सुडौल होतो. (जोडीला योग्य व्यायाम आणि आहार घेतला तर)
स्तनाचा, अंडाशयाचा, गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
प्रसुतीनंतरचा अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो.
स्तनपान सुलभ आहे, कोणत्याही पूर्व तयारीची गरज नाही.
उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळते.
आर्थिकदृष्ट्या बचत होते. शिवाय स्तनपान घेणारी बाळे वारंवार आजारी पडत नाहीत. त्यामुळे औषधोपचाराचा खर्च वाचतो.

स्तनपानाची सुरुवात किती वेळाने करावी?
नॉर्मल प्रसुती असेल तर आईने 5-10 मिनिटांच्या आत बाळाला जवळ घ्यावे व स्तनपान द्यावे. त्यामुळे दूधग्रंथीमधून दूध उतरायला सुरुवात होते. पहिले 3 दिवस अत्यंत कमी प्रमाणात व पिवळसर रंगाचा चिक येतो. त्याचे फायदे ः
पहिल्या एक तासात बाळ अतिशय सतर्क व स्तनपानासाठी उत्सुक असते.
बाळाला ऊब मिळते.
जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
स्तनपानाची यशस्वी सुरुवात होते व स्तनपान जास्त काळ सुरू राहण्याची शक्‍यता वाढते.

सिझर झाले असेल तर भूल उतरल्यावर किंवा 45 मिनिटांनंतर लगेच बाळाला आईचे दूध द्यावे. आईला बसून पाजता येत नसेल तर नर्सिंग स्टाफच्या मदतीने व घरच्या नातेवाईकांच्या मदतीने आईला एका कुशीवर वळवून पाजता येते. किंवा सरळ बाळाला आईच्या छातीवर बालथे झोपवून स्तनपान देता येते. पहिल्या 2-3 दिवसांत आईला चिक दूध येत असते. याचे प्रमाण कमी असलं तरी ते अतिशय पौष्टिक असते. बाळाच्या गरजेनुसार येते व त्याची तहान व भूक भागवण्यास पुरेसे असते.

– डॉ. मेधा क्षीरसागर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.