Brij Bhusan Singh Case Update : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली आहे. शनिवारी (२१ ऑक्टोबर) दिल्ली न्यायालयात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने हजर झालेले अधिवक्ता राजीव मोहन यांनी या प्रकरणात साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास असल्याचा युक्तिवाद केला आहे.
यासोबतच त्यांनी सांगितले की, ‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पर्यवेक्षण समितीने सात दिवसांत एफआयआर दाखल करण्याची शिफारस करायची होती, परंतू समितीने असे काहीही केलेले नाही. सिंह यांना डिस्चार्ज करण्याची मागणी करताना, त्यांच्या वकिलाने म्हटले आहे की, तपासणी समितीने कोणतीही शिफारस केलेली नसल्यामुळे, प्रथमदर्शनी असे दिसून येते की ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत.’
विशेष बाब म्हणजे ब्रिजभूषण सिंग या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित नव्हते कारण त्यांच्या वकिलाने त्यांना सूट देण्यासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मान्य केला होता. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते.
या संदर्भात त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सर्व तक्रारदारांनी वैयक्तिक कारणास्तव हे आरोप केले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त प्रशिक्षक किंवा इतर कोणीही त्यांच्या समर्थनार्थ कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. तक्रारीतही बराच विलंब झाला आणि प्रतिज्ञापत्रात तुर्कीचा उल्लेख त्याच आरोपात केला आहे, तर तक्रारदाराने दिल्लीचा उल्लेख केला आहे.
ब्रिजभूषण सिंग यांच्या वकिलाने दिलेल्या युक्तिवादाला दिल्ली पोलिसांनीही विरोध केला आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, ‘जर तपासणी समितीने आपली शिफारस केली नसेल तर याचा अर्थ समितीने त्यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली असा होत नाही. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ३० ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे.’
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांनी घेरलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि इतरांनी एकत्र येऊन दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणाबाबत विरोधी पक्ष काँग्रेससह अन्य पक्षांनी भाजपला चारही बाजूंनी घेरले आहे.