पुणे: महाराष्ट्र क्रीडातर्फे आयोजित व इन्फोसिस रिक्रिएशन क्लब पुरस्कृत आंतर आयटी टी-20 क्रिकेट स्पर्धेत विप्रो टेक्नॉलॉजीज, केपजेमिनी व टीसीएस या संघांनी आगेकूच केली.
या स्पर्धेत विप्रो टेक्नॉलॉजीज संघाने पर्सिस्टंट सिस्टीम संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राजकुमार यादव व आशिष अरमाल यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पर्सिस्टंट सिस्टीम संघाला 20 षटकांत 9 बाद 159 धावांवर समाधान मानावे लागले. विप्रो टेक्नॉलॉजीज संघाने 3 चेंडू राखत 5 बाद 160 धावांसह पूर्ण करत विजय मिळवला.
दुसऱ्या लढतीत केपजेमिनी संघाने आयबीएम संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रतिक कुलकर्णीच्या नाबाद 70 धावांसह आयबीएम संघाने 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या.
144 धावांचे लक्ष रॉबिन जोशीच्या नाबाद 41 धावांसह केपजेमिनी संघाने 16.5 षटकात 6 बाद 148 धावा करून पूर्ण करत विजय मिळवला. रॉबिन जोशी सामनावीर ठरला. अन्य लढतीत टीसीएस संघाने बार्कलेज संघाचा 9 धावांनी पराभव केला.