मालवाहतुकीसाठी छोटी चारचाकी वाहने उपलब्ध करण्याचा सपाटा टाटा मोटर्सने चालूच ठेवला असून, या क्षेत्रातून टाटा मोटरच्या ताळेबंदात भरीव योगदान होत असल्याचे दिसून येते. मालवाहतुकीच्या गरजा ध्यानात घेऊन टाटा मोटर्सने मे महिन्यापासून भारतीय बाजारपेठेत टाटा इंट्रा नावाचे नवीन मालवाहतूक चारचाकी वाहन उपलब्ध केले आहे. या कंपनीने याअगोदर छोटे एस ट्रक उपलब्ध केले होते. ज्यांना यापेक्षा अधिक दर्जेदार आणि मोठे ट्रक हवे आहेत त्यांच्यासाठी टाटा इंट्रा हे वाहन उपलब्ध करण्यात आले असल्याचे कंपनीने टाटा इंट्राच्या सादरीकरणावेळी स्पष्ट केले होते.
टाटा इंट्रामध्ये माल वाहण्याची अधिक क्षमता आहेच त्याचबरोबर चालकाला कमी त्रास आणि थकवा होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे हे वाहन व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये वेगात लोकप्रिय होऊ लागले आहे. टाटा इंट्रा व्ही 10 हे वाहन मालवाहतुकीच्या मध्यम स्वरूपाच्या गरजा असणाऱ्यांसाठी विकसित करण्यात आले आहे. तर टाटा इंट्रा व्ही 20 हे वाहन अधिक माल दूर अंतरापर्यंत वाहून नेणाऱ्यांसाठी विकसित करण्यात आले आहे.
व्ही 20 मध्ये गिअर शिफ्ट सल्लागार हे नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य उपलब्ध करण्यात आल्यामुळे गिअर शिफ्ट करताना चालकाला त्रास होत नाही. त्याचबरोबर वाहनाची इंधन क्षमता वाढते. व्ही 20 ला चार सिलिंडर 1396 सीसीचे इंजिन असून 70 एचपी पॉवर मिळते. यामुळे दूर अंतरावर अधिक माल वाहून नेणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या गरजा भागतात. इंट्रा व्ही 20 च्या चाकाचा आकार बराच मोठा असल्यामुळे वाहन वेगात असताना स्थिर राहते. कमी आवाज, कमी थरथर, मोठी कॅबिन, पॉवर स्टिअरिंग यामुळे हे वाहन मालवाहतुकीसाठी अधिक सोयीचे झाले आहे. त्यामुळे देशभरातून या वाहनाची मागणी उत्तरोत्तर वाढत आहे. यातून 1100 कि. माल वाहून नेला जाऊ शकतो. टाटा मोटर्सने उपलब्ध केलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 72 हजार कि.मी.ची दोन वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. त्याचबरोबर 24 तास चालणारी हेल्पलाईन उपलब्ध करण्यात आली आहे.