विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कोरी गॉफकडून व्हीनस विल्यम्स पराभूत

विम्बल्डन – कोरी गॉफ या पंधरा वर्षीय खेळाडूने माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सला पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पहिल्याच फेरीत सनसनाटी विजय नोंदविला. द्वितीय मानांकित नाओमी ओसाका व फ्रान्सचा अनुभवी खेळाडू गेल मोंफिल्स यांचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

अमेरिकन खेळाडू गॉफ हिने मुख्य फेरीत स्थान मिळविणारी सर्वात लहान खेळाडू होण्याचा विक्रम केला होता. तिने आपल्याच देशाची वरिष्ठ खेळाडू व्हीनस हिला 6-4, 6-4 असे सरळ दोन सेट्‌समध्ये नमविले. तिने पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच तिने व्हॉलीजवरही चांगले नियंत्रण ठेवले होते. व्हीनसने या स्पर्धेत पाच वेळा अजिंक्‍यपद मिळविले आहे. कझाकिस्तानच्या युलिया पुनित्सेवा हिने ओसाका हिचा 7-6 (7-4), 6-2 असा पराभव केला. चीन तैपेईच्या यू वेई हेसिहा हिने लाटवियाच्या येलेना ओस्तापेन्को या मातब्बर खेळाडूला 6-2, 6-2 असे चकित केले.

14 वी मानांकित खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी हिने स्पेनच्या सारा सोर्बिस तोर्मी हिच्याविरूद्ध पहिल्या सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतली असताना सारा हिने दुखापतीमुळे माघार घेतली. अमेरिकेच्या स्लोएनी स्टीफन्स हिने स्वित्झर्लंडच्या तिमिया बॅसिनस्की हिच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळविला. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिन प्लिस्कोवा हिने दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना चीनच्या लिन झुओ हिचे आव्हान 6-2, 7-6 (7-4) असे संपविले. विजेतेपदासाठी प्रबळ खेळाडू असलेल्या सिमोना हॅलेप हिने बेलारुसच्या ऍलेक्‍झांड्रा हिच्यावर 6-4, 7-5 असा विजय मिळविला.

पुरुष विभागात इटलीच्या थॉमस फॅबियानो याने स्टेफानोस त्सित्सिपास या ग्रीसच्या खेळाडूला चुरशीच्या लढतीनंतर हरबिले. हा सामना त्याने 6-4, 3-6, 6-4, 6-7 (8-10), 6-3 असा जिंकला. अग्रमानांकित नोवाक जोकोवीच याने फिलीप कोहेलश्रेबर याच्यावर 6-3, 7-5, 6-3 असा विजय मिळविला. स्थानिक खेळाडू काईल एडमंड याने स्पॅनिश खेळाडू जेमी मुनार याला 6-4, 6-4, 6-4 असे हरविले.

Leave A Reply

Your email address will not be published.