#CWC19 : पराभवातून शिकावयास मिळाले- पूरन

चेस्टरलेस्ट्रीट – विश्‍वचषक स्पर्धेतील आमचे बाद फेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, या पराभवातून मला खूप काही पराभवातून शिकावयास मिळाले असे वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन याने सांगितले.

श्रीलंकेविरूद्धच्या लढतीत पूरन याने आक्रमक शतक टोलवूनही त्याच्या संघास निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचे एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील हे पहिलेच शतक आहे. त्याने सांगितले की, या सामन्यात मला फॅबियन ऍलन याची सुरेख साथ मिळाली. खरतर आम्ही विजयश्री जवळजवळ खेचून आणली होती. आमच्या झंझावती खेळामुळे लंकेच्या गोलंदाजीतील हवाच निघून गेली होती. नेमकी कशी गोलंदाजी करायची हे त्यांना सुधरतच नव्हते.

माझ्या चुकीमुळे ऍलन धावबाद झाला व आम्ही विजयाची संधी घालविली. या स्पर्धेत आम्हाला दुसऱ्यांदा विजयाच्या उंबरठ्यावरुन परतावे लागले होते. या स्पर्धेत आमच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी आम्हा युवा खेळाडूंना भावी करिअरसाठी शिकवणीची शिदोरी मिळाली आहे. माझ्याकडून चाहत्यांची मोठी अपेक्षा होती. त्याची पूर्तता करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. मला भविष्यात संघाकडून संधी मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. मी माझ्या क्षमतेइतकी कामगिरी करण्यावर भर दिला होता. त्याबाबत मला समाधान वाटते.

भारतीय संघ तीन ऑगस्टपासून वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी-20 चे तीन सामने, एक दिवसीय तीन सामने व दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील अपयश धुवून काढण्याची संधी विंडीजला मिळणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.