मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेतील आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी असे संकेत दिले आहेत. आमदारांची संख्या तीनशेपेक्षा अधिक होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात जास्त आमदार बसता येतील अशा प्रकारे विधानसभेची इमारत बांधावी लागेल, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
सध्या विधिमंडळात विधानसभेत 288 तर विधान परिषदेत 78 आमदार आहेत. नव्या रचनेत विधानसभेतील सदस्य संख्या 360 तर विधान परिषदेतील संख्या 100 वर जाऊ शकते, असे संकेत फडणवीस यांनी दिल्याने आमदार होऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Maharashtra MLA)
फडणवीस म्हणाले, मी यापूर्वी खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमाला गेलो आहे. पण, खासगी इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला आलो आहे. हे माझे पहिले अशासकीय भूमिपूजन आहे. देशातल्या सर्व राज्यातील विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. 2026 मध्ये विधानसभा (Widhansabha) जागा वाढणार आहेत. सध्याची वास्तू नवीन आलेल्या आमदारांना सामावू शकणार नाही. आता अंदाजे 300 विधानसभेत आहेत. त्यापुढे जाऊन 360 होऊ शकतात. आता अशा प्रकारची बिल्डिंग तयार करायचा विचार आला तर तुम्ही जी बिल्डिंग तयार केली आहे तेच चित्र आमच्या डोळ्यासमोर येईल. त्याच्यापेक्षा कुठलंही डिझाईन आम्ही मान्य करू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
लोकसंख्या वाढल्याने निर्णय
पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महानगरातील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे अशा पाच लाख किंवा त्याहून अधिक मतदारसंख्या असलेले विधानसभा मतदारसंघ विभागून नवे मतदार संघ तयार होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील इच्छुकांच्या आमदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण लवकरच मतदार संघ पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
नार्वेकरांनी दिले नव्या विधानभवनाचे संकेत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले की, नव्या संसद भवनासारखंच लवकरच राज्यालाही नवे विधान भवन मिळणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. विधान भवनाची नवी वास्तू उभारण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले.