World Cup 2023 India vs New Zealand Match : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 259 धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या गत सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 48व्या शतकाला गवसणी घातली. यासह तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याचा उंबरठ्यावर आहे.
गतसामन्यात कोहलीने षटकार ठोकताना आपले शतक पूर्ण केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करतो का? हे पाहणे आता अतिशय मनोरंजक ठरणार आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यास त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके होतील आणि तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.
वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे.
274 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला धक्का बसला आहे. 71 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा 40 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि स्टंपवर गेला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारताच्या सध्या 12.3 षटकात 1 बाद 76 धावा झाल्या असून विजयासाठी 198 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे या सामन्यात शतक लगावताना भारताच्या विजयासह त्याला सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.