मुंबई – राज्यात झालेल्या सत्तांतरांतर प्रशासकीय पातळीवर अनेक फेरबदल होताना दिसून येत आहे. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लवकरच लॉटरी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रश्मी शुक्लांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रश्मी शुक्ला यांना थेट मुंबई पोलीस आयुक्तपद मिळण्याची दाट शक्यता आहे. पोलीस आयुक्तपद न मिळाल्यास प्रभारी पोलीस महासंचालक असलेल्या रजनीश शेठ यांच्या जागी त्यांची नियुक्ती होण्याची अटकळ बांधली जात आहे.
यापूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी किंवा राज्याच्या महासंचालकपदी नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असायचे. मात्र आता थेट निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच घेणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. येत्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बदल्यांच्या यादीवर अंतिम मोहर उमटवतील असे समजते.
राज्य सरकारने 30 जून रोजी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर पदभार सांभाळला. त्या जागी आता केंद्रात एसआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या रश्मी शुक्लांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला धोका देत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. या राजकीय नाट्यातील 36 दिवसांत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्लांवर आरोप आहे.
येत्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आपल्या मर्जीतील अधिकारी त्या-त्या शहराच्या पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तपदी असावेत, अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
मोठे फेरबदलाचे संकेत
या बदल्यांमध्ये भूषण उपाध्याय, सदानंद दाते, बिपीन कुमार सिंग, विनय कारगावकर, अमिताभ गुप्ता, आशुतोष डुंबरे, सुखविंदर सिंग, व्ही. के. चौबे, अमितेश कुमार, रविंदर कुमार सिंगल, विश्वास नांगरे पाटील, राजकुमार व्हटकर, के एम प्रसन्ना, एम. एस लोहिया, व्ही जाधव, लखमी गौतम, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. एच. महावरकर, एन. पी. तांबोळी, चंद्रकिशोर मीना, आरती सिंग, सचिन पाटील या दोन डझनभर आयपीएस अधिकाऱ्यांच्याही लवकरच बदल्या होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसांत पोलीस विभागात मोठे फेरबदल होणार असल्याचे दिसून येईल.