उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नियोजित आराखडा सादर
पूर्व भागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांकडून मागणीला पुन्हा जोर
– महादेव जाधव
फुरसुंगी – पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेल्या हडपसर आणि आसपासच्या गावांचे नागरिकरण झपाट्याने झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, विरार, वसई अशा नव्या महानगरपालिकांप्रमाणे पुणे शहराचीही हडपसर अथवा नवे पुणे अशी नवी महानगरपालिका व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे.
यासाठीचा नियोजित आराखडाही पवार यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आमदार चेतन तुपे, आमदार ऍड. अशोक पवार आणि आमदार संजय जगताप यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वतंत्र महापालिका व्हावी यासाठी पत्र दिलेले आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसर आणि हवेली मतदारसंघातील लोकसंख्या, भौगोलिक दृष्टिकोनातील सर्व निकष महानगरपालिकेसाठी पुरेसे आहेत. सासवडमध्ये होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, महामार्गांची उपलब्धता, खडकवासला धरणातून कालव्यांद्वारे पाण्याची उपलब्धता पाहता नविन महानगरपालिका निर्मिती शक्य आहे.
हडपसरमधील मगरपट्टा, अमानोरा, लोणी काळभोरमधील लेक सिटी अशा वेगवेगळ्या टाऊनशीप आहेत. त्यामुळे या परिसराला मोठ्या शहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महानगरपालिकेसाठी 15 लाख लोकसंख्या असेल तर “ब’ दर्जाची महानगरपालिका होऊ शकते.
पूर्व भागात कात्रज, उंड्री, येवलेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, औताडेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, उरुळी देवाची, फुरसुंगी, वडकी, साडेसतरानळी, केशवनगर, मांजरी बुद्रुक आणि खुर्द, शेवाळेवाडी, कोलवडी,कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी आणि उरुळीकांचन, तसेच वाघोली, लोणीकंद या गावांची मिळून स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, अशी मागणी 2007 पासून केली जात आहे.
उच्च न्यायालयातही याचिका…
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रवीण तुपे, फुरसुंगीचे माजी सरपंच दिनकर हरपळे, प्रा.जे.पी. देसाई यांनी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती. पुणे महानगरपालिकेत 1997 मध्ये 38 गावे घेण्याचे ठरविले. मात्र, त्यातील 20 गावे वगळली, त्यानंतर पुन्हा 34 गावे घेतली गेली. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेचे 447 चौरस किलोमीटर पुणे शहराचे क्षेत्रफळ होत आहे. त्यामुळे पूर्व भागाची स्वतंत्र हडपसर स्वतंत्र महानगरपालिका गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
1997 पासून म्हणजे 23 वर्षांपासून पुणे शहराचे झोनिंग झालेले नाही. त्यामुळे बांधकाम करण्यात अडचणी येत आहेत. सर्वसामान्य नागरिक अर्धा-एक गुंठा जागा घेऊन घराचे बांधकाम करीत आहेत. त्यापेक्षा टाऊन प्लॅनिग करून शहराचा विकास करणे ही काळाची गरज आहे.
– सचिन घुले, उपसभापती, पंचायत समिती, हवेली
पुणे महापालिकेला मूलभूत नागरी सुविधा पुरविताना मोठा ताण येत असून समाविष्ट गावांचा विकास होण्याऐवजी बकालपणा येत आहे. त्यामुळे स्वतंत्र महापालिका हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.
– निवृत्ती बांदल, माजी सरपंच, उंड्री
पुरंदर मतदारसंघात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेची निर्मिती झाल्यास परिसराचा सर्वांगीण व नियोजित विकास होण्यास फायदेशीर ठरणार आहे.
– उल्हास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना