Singapore’s new Prime Minister Lawrence Wong sworn – सिंगापूरचे नवीन पंतप्रधान म्हणून अर्थतज्ज्ञ लॉरेन्स वोंग यांचा आज शपथविधी झाला. वोंग हे सिंगापूरचे चौथे पंतप्रधान आहेत. ली सिएन लूंग यांनी दोन दशकांनंतर आपल्या पदाचा त्याग केला. त्यांचे उत्तराधिकरी म्हणून वोंग यांनी पंतप्रधानपद स्वीकारले आहे. दोघेही सत्ताधारी पीपल्स ऍक्शन पार्टी (पीएपी) चे नेते आहेत. पंतप्रधान बनण्यापूर्वी वोंग, हे सिंगापूरचे उपपंतप्रधान होते. पीएपी पक्षाच्या चौथ्या पिढीचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून ते नेतृत्व करणार आहेत.
आज अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी वोंग यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. सिंगापूरच्या राजकीय परिघातील हे अत्यंत सामान्यपणे झालेले स्थित्यंतर होते, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. वोंग यांनी मंत्रिमंडळामध्ये कोणताही मोठा बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. ली सिएन लूंग यांच्या सरकारपासून वोंगच्या सरकारपर्यंत बहुतेक सर्व मंत्री त्यांच्या खात्यांवर कायम आहेत, कामामध्ये सातत्य राखण्याचे वोंग यांचे धोरणच यातून दिसून येते.
एप्रिल २०२२ मध्ये, पीओपीच्या चौथ्या पिढीचे नेते म्हणून वोंग यांना निवडण्यात आले आणि त्याच वर्षी जूनमध्ये उपपंतप्रधान म्हणून त्यांची पदोन्नती करण्यात आली. सिंगापूरला भारतासह आशियासाठी गुंतवणूक निर्माण करणारे आशियाई आर्थिक केंद्र आणि जागतिक नेटवर्कसह एक व्यापार केंद्र म्हणून दर्जा दिल्याने वोंगच्या नेतृत्वाखालील सरकारने व्यवसाय-समर्थक धोरणे सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.