वॉशिंग्टन – तैवानमध्ये लोकशाही मार्गांने निवडून आलेल्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी अमेरिका एक बिगर सरकारी शिष्टमंडळ तैवानला पाठवणार आहे. बायडेन प्रशासनाच्यावतीने ही घोषणा करण्यात आली. मात्र अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन संतप्त होणार आहे, हे निश्चित आहे.
प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टीचे लाइ चिंग-ते हे अध्यक्षपद स्वीकारतील आणि त्याच पक्षाच्या त्साई इंग-वेन यी अध्यक्षपदावरून पायउतार होतील. तैवान हा चीनचाच भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तैवानला चीनच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करण्याची तयारी देखील चीनने दर्शवली आहे.
अमेरिकेने तैवानशी थेट कोणताही संबंध ठेवण्याला चीनने नेहमीच विरोध केला आहे. त्यामुळे २० मे रोजी होणाऱ्या शपथविधीला आणि त्यानंतरच्या नवीन तैवान अधिकाऱ्यांशी अमेरिका कोणत्या मार्गाने व्यवहार करते याचा परिणाम चीन-अमेरिका संबंधांवर देखील होईल.
दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चिनी इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, स्टील, सोलर सेल आणि ऍल्युमिनियमवर भारी सीमाशुल्क लादले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर १०० टक्के, सेमीकंडक्टरवर ५० टक्के दर आणि चीनकडून येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर प्रत्येकी २५ टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. यामुळेही अमेरिका आणि चीन दरम्यानच्या संबंधांवर विपरीत परिणाम होणार आहे.