भाजपमध्ये गेलेला आणखी एक नेता तृणमूलमध्ये परतणार? बॅनर्जी-घोष भेटीमुळे चर्चांना उधाण…

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धोबीपछाड देत तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. निवडणुकांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपच्या गोटात सामील झाले होते.

मात्र आता निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालच्या जनतेने जनादेश ममतांच्या पारड्यात टाकल्याने हे नेते घरवापसी करताना दिसतायेत. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची कालच (शुक्रवारी) घरवापसी झाली.

यानंतर राज्यातील आणखी काही भाजप नेते तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. अशातच आज भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी तृणमूलचे राज्य सचिव कुणाल घोष यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजीव बॅनर्जी यांच्या तृणमूल प्रवेशाबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चिल्या जात आहेत. अशातच आज ही भेट घडून आल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडणार काय? असे तर्कवितर्क सुरु आहेत.

दरम्यान, राजीव बॅनर्जी यांनी देखील राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी हाती भाजपचा झेंडा घेतला होता. त्यांनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र यंदा  भाजपच्या तिकिटावर लढलेल्या बॅनर्जी यांना निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.