नवी दिल्ली – भारतातील फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमनिकाच्या कोर्टाने जामीन नाकारला आहे. त्या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली तो तेथील कारागृहात आहे. तेथील हायकोर्टाने शुक्रवारी हा निकाल दिला.
जामीन दिल्यानंतर तो फरारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे. त्याला सशर्तही जामीन देता येणार नाही कारण तो या अटी पाळण्याची कोणतीच खात्री नाहीं. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करणे हे धोक्याचे आहे असे मतही कोर्टाने नोंदवले आहे. त्याचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने या आधीच फेटाळल्याने त्याने तेथील हायकोर्टात धाव घेतली होती.
चोक्सी हा पंजाब नॅशनल बॅंकेला साडेतेरा हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळून गेला आणि त्याने अँटिगुआत नागरिकत्व घेतले आहे. सन 2018 पासून तो तेथे राहात आहे. 62 वर्षीय चोक्सी हा 23 मे रोजी तेथूनही गायब झाला होता. त्याला नंतर डॉमनिका देशात पकडण्यात आले होते.