मुंबई – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तथापि सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिगर भाजप पक्षांची व्यापक एकजूट घडवण्याची गरज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
पवार आणि किशोर यांच्यातील भेटीच्यावेळी निश्चितपणे याच विषयावर चर्चा झाली असणार, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. गेल्या महिन्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही अशीच भूमिका मांडली होती. यूपीएची पुर्नरचना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी पवारांशी केलेल्या चर्चेला महत्त्व दिले जात आहे. प्रशांत किशोर यांचा अनेक प्रादेशिक पक्षांवर प्रभाव आहे अनेक राजकीय पक्षांना सत्ता मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी पवारांना भेटण्याला महत्त्व दिले जात असले तरी पवार किंवा किशोर यांनी या विषयी माध्यमांपुढे मात्र कोणतेही भाष्य केलेले नाही. आज नवाब मलिक यांनी बिगर भाजप पक्षांची एकजूट हा विषय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असल्याची बाब पीटीआशी बोलताना नमूद केली आहे.