बाजार समिती आवारानजीक रस्त्याला मोठे खड्डे
वडूज – वडूज-पुसेगाव मार्गावर बाजार समितीनजीकच्या ओढ्यातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. या मार्गावर एखादा बळी गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहे.
वडॅज शहरापासून एक किलोमीटर अंतरावर शिवराज पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या ओढ्याला महिनाभरापूर्वी झालेल्या पावसाने जोरदार पाणी आले होते. त्यावेळी या ओढ्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. शिवाय दोन्ही बाजूला रस्ता खचून डांबर व मातीचे मोठे ढीग तयार झाले आहेत. त्यामुळे येथून जाताना दुचाकी, चारचाकी वाहनांना हे खड्डे चुकविणे अवघड बनले आहे.
समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी रस्त्याकडेला वाहन घेणे अवघड झाले आहे. या मार्गावर सतत दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. या ठिकाणी खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने हे खड्डे त्वरित भरून घ्यावेत आणि दोन्ही बाजूंना खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत
आहेत.