पिंपरी – पोलिसांनी तात्काळ केलेल्या हालचाली, दाखविलेली सतर्कता आणि पालकांनी वेळीच पोलीस ठाणे गाठल्यामुळे घराबाहेर फिरता-फिरता रस्ता भटकलेली चिमुकली अवघ्या काही तासांतच सापडली. मुलगी सापडल्याने पालक आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
संतोषी विजय साहू (वय 4, रा. थेरगाव) असे मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथे राहणाऱ्या विजय साहू यांची संतोषी ही चार वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास खेळता-खेळता ती घरापासून जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर आली व पुढे चालू लागली. काही वेळ ती तशीच पुढे-पुढे चालत राहिली. काही वेळानंतर संतोषी घरी आली नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही संतोषी सापडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर थेट वाकड पोलीस ठाणे गाठले व मुलगी हरविल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकड पोलिसांनी संतोषीचा फोटो आणि तिच्या संबंधित माहिती विविध यंत्रणेद्वारे प्रसारित केली.
तसेच वाकड पोलीसही संतोषीच्या शोधासाठी बाहेर पडले. संतोषी राहत असलेल्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोषी रस्त्यावरून चालत जात असल्याचे दिसून आले. संतोषी ज्या मार्गावरून जात होती त्या मार्गावरील सर्व कॅमेरे तपासण्यात आले. संतोषी सुमारे तीन किलोमीटर एकटीच चालत येऊन तापकीर चौकात उभी असल्याचे एका वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. वाहतूक पोलिसाने संबंधित मुलीची चौकशी करून तिला आपल्याजवळ घेतले. त्यानंतर वाकड पोलिसांशी संपर्क करून मुलीसंदर्भात माहिती दिली.
माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तापकीर चौकात धाव घेत मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या हवाली केली. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या हालचालींमुळे अवघ्या काही तासांतच हरविलेल्या संतोषीचा शोध लागल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य झळकले.