नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातला एक फोटो समोर आला आहे. याच फोटोवरून सध्या देशाच्या राजकारणात गोंधळ सुरु झाला आहे.कारण या फोटोत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आले असून हा संपूर्ण देशाचा अपमान असल्याचा गंभीर आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखी त्यांनी यावेळी केली.
पत्रकार दिलीप मंडल यांचे ट्वीट रिट्विट करत योगेंद्र यादव यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिघेही दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि अश्विनी वैष्णव तसंच धर्मेंद्र प्रधान यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन देण्यात आले. या प्रकरणी आता योगेंद्र यादव यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे खरं असेल तर हा संपूर्ण देशाचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
योगेंद्र यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले पाहिजे. राष्ट्रपतींसह जातीभेद झाला असेल तर संपूर्ण देशाचा अपमान आणि गंभीर अपराध आहे असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.
इस प्रकरण का पूरा सच देश के सामने आना चाहिए। अगर सच यह है कि महामहिम राष्ट्रपति के साथ जातीय भेदभाव हुआ तो यह पूरे देश का अपमान है और संगीन अपराध है। https://t.co/mmyEQN9hfF
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) June 25, 2023
पत्रकार दिलीप मंडल यांनी याविषयीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेचा व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे की, “आम्ही हे पाहिलं आहे की अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. मग भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅरियरच्या बाहेर का उभं केलं गेलं आहे? त्यांना गाभाऱ्यात प्रवेश का दिला गेलेला नाही? धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातील मूर्तींना गाभाऱ्यात जाऊन स्पर्श केला आणि दर्शन घेतलं. त्याच मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मात्र बाहेरुन पूजा केली. ही बाब चिंताजनक आहे, या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे तसंच पुजाऱ्यांना अटक केली गेली पाहिजे” अशीही मागणी दिलीप मंडल यांनी केली आहे.
दिलीप मंडल यांचे हेच ट्वीट योगेंद्र यादव यांनी ट्वीट करत राष्ट्रपतींना बाहेर का उभं केलं गेलं? असा प्रश्न विचारला आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. २० जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचा आरोप होतो आहे.