मुंबई – अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. नुकताच तिच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. मात्र आता अमृता रत्नागिरीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळी तिने कुंभारकाम शिकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमृताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रत्नागिरीच्या आरे-वारे या गावात असणाऱ्या एका होम-स्टेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने आणखी एक स्टोरी शेअर केली असून ज्यात ती चक्क कुंभारकाम शिकत आहे. ही कला शिकून घेतानाचा व्हिडिओ गार्गी कदम या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे, अमृताने तोच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये रीशेअर केला आहे. अमृता खूप मन लावून मातीचं भांडं घडवण्याची कला शिकते आहे. या व्हिडिओला अमृताने कॅप्शन दिलं की, ‘काही कळलंय आयुष्य मला, काही अजून कळायचंय. थोडं आहे परिपूर्ण थोडं अजून घडायचंय’. रत्नागिरीला जाण्यापूर्वी अमृता कोल्हापुरला देखील गेली होती.
दरम्यान, ‘चंद्रमुखी’ चित्रपटासह अमृता ‘ऑटोग्राफ’ सिनेमातही दिसली होती. ‘ऑटोग्राफ’ सिनेमाचा स्टार प्रवाह वाहिनीवर थेट प्रीमियर दाखवण्यात आला होता. यानंतर आता अमृता लवकरच ‘कलावती’ सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात अमृतासह तेजस्विनी लोणारी, संजय नार्वेकर, हरिश दुधाणे,संजय शेजवळ, नील सालेकर, ओंकार भोजने, दिप्ती धोतरे हे कलाकार देखील असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.