नवी दिल्ली : संपूर्ण जगभरावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोनाने इटलीमध्ये एका दिवसात 793 लोकांचे बळी घेतले आहेत. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 12 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अडीच लाख लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. चांगली बातमी म्हणजे चीनमध्ये सतत गेल्या तीन दिवसांपासून घरगुती संक्रमणामुळे कोरोना झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्वात जास्त मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहे. येथे आतापर्यंत 4825 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान शनिवारी पाठवण्यात आले. दरम्यान, 263 विद्यार्थ्यांचा दल भारतात येण्यासाठी रवाना झाले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोरोना पॉझिटिव्हची ही पहिली केस होती. तर आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस आणि त्यांच्या पत्नीची कोविड-19 टेस्ट करण्यात आल्याचे समोर आले असल्याचे सांगण्यात येत आहे.