नवी दिल्ली – केरळ सरकारने बुधवारी ओणम बंपर लॉटरीची (Kerala Lottery Result) सोडत जाहीर केली. त्यानुसार, एका विजेत्याला सर्वोच्च बक्षिसापोटी तब्बल 25 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला. मात्र, तो भाग्यवान कोण ते तातडीने समजू शकले नाही.
ओणम सणाचे औचित्य साधून केरळ सरकारने बंपर लॉटरी तिकिटे (Lottery Result) जारी केली. प्रत्येक तिकिटाची किंमत 500 रुपये इतकी ठेवण्यात आली. सोडत जाहीर होण्याच्या आधी म्हणजे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे 75 लाख तिकिटे विकली गेली.
तो केरळमधील आजवरचा विक्रम ठरला आहे. प्रथम क्रमांकाचे 25 कोटी रुपयांचे बक्षीसही आजवरचे देशभरातील सर्वोच्च ठरले आहे. साहजिकच, ओणम बंपर लॉटरी सोडतीविषयी केरळमध्ये (Kerala Lottery Result) प्रचंड उत्सुकता होती.
उत्तर कोझिकोडमधील एजन्सीने विकलेल्या तिकिटाने प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संबंधित दुकानापुढे प्रचंड गर्दी उसळली. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही कॅमेऱ्यांसह तिथे दाखल झाले.
मात्र, जॅकपॉट लागलेला नेमका कोण ते तातडीने समजू शकले नाही. जॅकपॉट लागलेले तिकीट काही दिवसांपूर्वी आपल्या पलक्कड शाखेने विकल्याची माहिती संबंधित दुकानदाराने दिली.
बंपर लॉटरीमध्ये दुसरा क्रमांक 20 जणांनी मिळवला. त्यांना बक्षिसापोटी प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळतील. तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या 20 जणांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची प्राप्ती होईल. तर, चौथ्या क्रमांकावरील 10 जणांना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळतील.