नवी दिल्ली- विरोधी पक्षांची आघाडी इंडियाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. विरोधी पक्षांत कॉंग्रेसलाच तो राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे सगळ्यांत जास्त जागा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. तथापि, या पक्षाचे नेते आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या भविष्यावर सध्या स्वल्पविराम लागला असल्यामुळे आता विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हा प्रश्न आहे.
अर्थात सर्वच पक्षांनी तूर्त हा विषय गुलदस्त्यातच ठेवणे पसंत केले आहे. मात्र तरिही यावर केलेल्या एका सर्वेक्षणात राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर सर्वाधिक मतदारांनी सहमती दर्शवली असल्याचे समोर येते आहे.
सी- वोटरने हे सर्वेक्षण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधान पदासाठी विरोधकांचा चेहरा कोण असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यात 33 टक्के लोकांनी प्रियंका यांच्या नावावर कौल दिला आहे. त्या या पदासाठी विरोधी पक्षांकडे बेस्ट चॉइस असतील असे नागरिकांनी म्हटले आहे.
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदासाठीचा चेहरा असावा असे 10 टक्के लोकांनी म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांना 14 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.