नवी दिल्ली – देशाच्या विविध भागात ढगफुटीसदृश पाऊस सुरूच आहे. गुजरातमधील जुनागड शहरात आज शनिवारी (22 जुलै) दुपारी ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार केला. अवघ्या 4 तासांत 8 इंच पाऊस कोसळला. त्याचबरोबर गिरनार पर्वतीय भागात 14 इंच पावसाची नोंद झाली.
डोंगरावरून वाहणारे पाणी जुनागड शहरात पोहोचले तेव्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्त्यांवर उभी असलेली वाहने क्षणात पुराच्या स्वाधीन झाली. शहरातील सखल भागात 5 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. एनडीआरएफचे पथक पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे.
जुनागड शहरातील भवनाथ परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील गोठ्यात गाईंसह अनेक जनावरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. कडवा चौकाजवळील मुबारक पाड्याचीही अशीच अवस्था झाली.
याठिकाणी सुमारे 6 फूट पाणी भरल्याने लोकांची घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जुनागडमधून जाणारा कुंडाचा पूल बंद करण्यात आला आहे.