वडापुरी,{विजय शिंदे} -लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले असून, राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणार्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी आणखीच रोचक सामना पाहावा लागणार आहे. गेल्या वर्षभरात बदलेली राजकीय परिस्थिती पाहता या वेळी थेट पवारांच्या घरातच आमने-सामने लोकसभेचा सामना रंगणार आहे. अशावेळी गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देणारा इंदापूर विधानसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आहे.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक रिंगणात असू शकतात अशी अटकळ बांधली जात आहे. अशावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ नेमकी काय भूमिका बजावतात, हे पाहणे आवश्यक आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर हा मतदार संघ अनेक निवडणुकात शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिला आहे.
तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळत पूर्वी शरद पवार नंतरच्या काळात सुप्रिया सुळे यांना साथ दिली; परंतु मंत्रीमंडळात सहकारी असलेले अजित पवार यांच्याशी त्यांचे कधीही पटले नाही. लोकसभा निवडणुकीत आघाडी व विधानसभा निवडणुकीत कुस्ती ठरलेली. यामुळेच पाटील यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जातात. पाटील यांच्या कन्या व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील- ठाकरे या सध्या जिल्हाभर संघटनेचे काम करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडेही उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या वर्षभरात राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व परंपरागत राजकीय विरोधक असणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे यावेळी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबरोबर असणार, तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी यापूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे, आमदार भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. तालुक्यातील आजी- माजी आमदार यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसणार आहेत. या वेळी इंदापूरमध्ये महाविकास आघाडीकडे सध्या तरी नेतृत्वाची कमतरता आहे
परंतु प्रवीण माने, तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अशोक घोगरे, अमोल भिसे, सागर मिसाळ यांच्या रूपाने शरद पवार गट मजबूत होताना दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार कोणी का असेना परंतु महायुतीच्या उमेदवाराबरोबर तालुक्यातील स्थानिक नेत्यांची मोठी फौज असणार आहे. एकंदरीतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या बद्दल असणारी सहानभूती कामाला येते की, महायुतीची एकजूट कामाला येते ते निवडणूक निकालानंतर समजेलच.
पंख छाटण्याचे काम
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजप व अजित पवार गटाचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. त्यामुळे निश्चितच एकमेकांचे पंख छाटण्याचे काम होणार आहे. इंदापुरात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे येत्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत हे दिसून येईल.
माने यांची भूमिका महत्त्वाची
अजित पवार गटापासून दुरावलेले प्रवीण माने हे सध्या शरद पवार गटात आहेत. माने सध्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर इंदापुरात विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक घडामोडी घडतील, अशी चर्चा इंदापुरात सध्या सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विजयात माने कुटुंबीयांचे महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे माने यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
अलिप्त नेते कोणासोबत?
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे सध्या राजकीय व्यासपीठांपासून अलिप्त दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते कोणत्या पवारांसोबत असणार, यावरही इंदापूरमधून लोकसभेचे गणित अवलंबून असणार आहे.