करोनाचा नायनाट करणारी लस शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत. अजुन कोणाला यश मिळाले नसले तरी युध्दपातळीवर सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत जरी लस शोधली गेली इतक्या कमी कालावधीत विकसित करून बाजारात दाखल झालेली ही पहिलीच लस असेल. सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्रेजेनेका यांच्याकडून तयार केली जाणारी लस अगदी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशेचा किरण जागला आहे. लवकरच काहीतरी सकारात्मक घडेल असा विश्वास त्यामुळे निर्माण झाला आहे.
140 प्रयत्न
सध्या करोनावर लस शोधण्यासाठी वेगवेगळ्या गटांचे प्रयत्न सुरू असून ते चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. या गटांची संख्या तब्बल 140 इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ऑक्सफर्डसह एकूण सोळा गटांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. यातील पाच गट चीनचे, तीन अमेरिकेचे, दोन ब्रिटनचे तर ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि रशियाच्या प्रत्येकी एका तज्ञ गटाचा समावेश आहे.
ऑक्सफर्डच्या लसीची तब्बल 800 जणांवर चाचणी घेतली जाणार आहे. या लसीचे तब्बल 10 कोटी डोस तयार करण्याच्या करारावर अगोदरच स्वाक्षरी करण्यात आली आहे. ब्रिटनमध्येच लस विकसित करणाऱ्या आणखी एका गटाने 300 जणांवर चाचणी सुरू केली आहे.
अमेरिकेची लसही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मॉडर्ना कंपनीकडून ती तयार केली जात आहे. लसीचे दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे काय निष्कर्ष आलेत ते अगोदरच त्यांनी सार्वजनिक केले आहेत.
मॉडर्नानेही 10 कोटी डोस तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस त्याचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस 30 हजार जणांवर अंतिम टप्प्यातील चाचणी घेण्याची कंपनीची योजना आणि नियोजन आहे.
सनोफी-ग्लॅक्सोस्मिथक्लाईन कंपनीचे लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फ्रान्सची कंपनी असलेल्या सनोफीने ब्रिटनच्या जीएसके कंपनीशी करार केला आहे. अनेक लोकांवर चाचण्या घेण्याचे काम सुरू असून 2020 मध्ये 10 कोटी तर 2021 मध्ये 100 कोटी डोस तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे सनोफी कंपनीने म्हटले आहे.
जर्मनीच्या बीएनटेक कंपनीनेही अनेक चाचण्या घेतल्या असून त्यांनी अमेरिकेतील एका दिग्गज कंपनीशी करारही केला आहे. अमेरिकेतही त्यांच्या चाचण्या सुरू असून ऑक्टोबर महिन्यात लसीचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
चीनच्या सीनोवेक बायोटेक कंपनीच्या लसीची तिसरी चाचणी झाली आहे. ब्राझीलही या लसीसाठी चीनसोबत काम करत असून पहिल्या दोन टप्प्यांत ज्यांना लस देण्यात आली, त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले असल्याचे कंपनीने सांगितले. लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. चीनच्याच आणखी एका कंपनीचे काम सुरू असून ज्या लोकांवर त्यांनी चाचण्या घेतल्या आहेत, त्यातील 80 टक्के लोकांच्या प्रतिकार शक्तीत आठवडाभराच्या आत अपेक्षित परिणाम साध्य झाल्याचा कंपनीचा दावा आहे.
अमेरिकेची नोवाक्स आणि एका ऑस्ट्रेलियन कंपनीचे कामही युध्दपातळीवर सुरू असून 2021 पर्यंत 150 कोटी डोस तयार करण्याचे त्यांची नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.