बारामती/जळोची (प्रतिनिधी) – करोना रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणीची प्रक्रीया वाढवावी. कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घ्यावी. तसेच कोव्हीडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
“करोना विषाणू प्रार्दुभाव निर्मुलन आढावा’ आणि “विविध विकासकामांची आढावा’ बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्या-त्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच करोनाच्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी. करोनाच्या संकटाशी सामना करताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
विकासकामांवर परिणाम नको
विकासाची कामे ही दर्जेदार व वेळेतच झाली पाहीजेत. जरी “करोना’चे संकट असले तरी त्याचा परिणाम विकासकामांवर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करावे. जेथे अतिक्रमण असेल ते योग्य ती कार्यवाही करून काढून टाकण्यात यावे; परंतु त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ न देता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.