शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले – अमित शहा

कोल्हापूर, सांगलीला अधिक सुंदर बनवून
कोल्हापूर: पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना विचारला.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचे पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण आम्ही सांगली, कोल्हापूरला पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवून दाखवू. यासाठी भारत सरकार महाराष्ट्र सरकारला पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिवसेनेचे दोन्ही खासदार अनुपस्थित
आज झालेल्या महायुतीच्या सभेत हा शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही अनुपस्थित होते. खंरतर राज्यभरात महायुतीच्या सभा घेतल्या जात आहेत आणि कोल्हापुरातल्या सभेला शिवसेनेचे दोन्ही खासदार अनुपस्थित राहिल्याने भाजप आणि सेनेमध्ये धुसफूस असल्याची अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक व जिल्ह्यातील महा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तपोवन मैदानावर झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, आम्ही जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून काश्‍मीरला भारतासोबत जोडले. कलम 370 हटवण्याची कोणाची हिंमत नव्हती. 56 इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून दाखवले. एका देशात दोन कायदे चालणार नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना दहशतवादी भारतात घुसायचे. आपल्या जवानांवर हल्ला करायचे. पण मनमोहन सिंग मौनात असायचे. नरेंद्र मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन “जशास तसे’ उत्तर दिले. कॉंग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर काही केले नाही आणि भाजपकडून जे निर्णय घेतले जातात त्याला कॉंग्रेसकडून विरोध केला जातो, असे शहा म्हणाले. शरद पवार विचारतात कलम 370 का हटवलं? कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले जेव्हा तुमच्याकडे प्रचाराला येतील तेव्हा त्यांना जाब विचारा, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरी चप्पलला जीआय मानांकन देऊन सन्मान मिळवून दिला. आत्ता कोल्हापूरला आयटी पार्क देऊ, अशी घोषणाही त्यांनी या सभेत केली. कोल्हापूरात 2014मध्ये महायुतीचा प्रचार शुभारंभ केल्यानंतर मोठे यश प्राप्त झाले होते. आता कोल्हापुरात येऊन अंबाबाईचं आशीर्वाद घेत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने महायुतीचा विजय पक्का असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.