Arun Goyal Resignation| लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता. त्यांनी पदाचा राजीनामा का दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी तत्काळ प्रभावाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या मुद्दयावरून गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? असा सवाल सामना अग्रलेखातून भाजपला करण्यात आले आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात?
“मोदी सरकारनेच अरुण गोयल यांची नियुक्ती केली होती. मग अचानक असे काय घडले की, गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आणि तेवढ्याच तातडीने तो मंजूरही झाला? संपूर्ण देशाला हा प्रश्न पडला आहे. मुळात अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी केलेली नेमणूक वादग्रस्त आणि अनैतिकही ठरली होती. एक आयएएस अधिकारी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतो काय आणि दुसऱ्याच दिवशी त्याची नियुक्ती निवडणूक आयुक्त म्हणून होते काय? हा सगळाच प्रकार धक्कादायक होता”, असे सामना अग्रलेखात म्हंटले आहे.
राजीव कुमार यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक पार पाडण्याचा मोदी सरकारचा डाव आहे का?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकटयाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक पार पाडण्याचा मोदी सरकारचा डाव आहे का? भाजपच्या ‘चार सौ पार’चे घोडे ज्या ‘ईव्हीएम’च्या वाऱ्यावर स्वार होणार आहे त्या घोडय़ाला अरुण गोयल यांचा काही लगाम बसण्याची भीती सत्ताधाऱ्यांना सतावत होती काय? त्यामुळेच चुनाव आयोगाला अधिक ‘विश्वासू’ नियुक्तीचा ‘चुना’ लावण्याचा सरकारचा खटाटोप सुरू आहे का?,” असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. Arun Goyal Resignation|
…हा विरोधकांसह जनतेचा हक्क
“कोरोना काळात उभारलेल्या ‘पीएम केअर’ फंडाचा हिशेब, सर्वोच्च न्यायालयानेच घटनाबाह्य ठरविलेल्या ‘इलेक्टोरल बॉण्डस्’चा तपशील… मोदी राजवटीतील उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी आहे. त्यात आता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याची भर पडली आहे. त्यामागील नेमके कारण जाणून घेणे हा विरोधकांसह जनतेचा हक्क आहे. तथापि, गोयल यांच्या राजीनाम्याचे गूढ काय? हा प्रश्नही मोदी राजवटीतील इतर अनेक संशयास्पद रहस्यांचा भाग बनण्याची शक्यता जास्त आहे,” असेही सामना अग्रलेखात लिहीत मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. Arun Goyal Resignation|
हेही वाचा:
Breaking ! महायुतीचं जागा वाटप झालं निश्चित ? ; पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी