पुणे – शहरात अनेक मोठे प्रकल्प सुरू असून या प्रकल्पांच्या प्रगतीची माहितीच महापालिका आयुक्तांना नियमित दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढे ज्या विभागाकडे 25 कोटींपेक्षा जास्त रकमेची विकास कामे सुरू आहेत, त्यांना दर 15 दिवसांनी आयुक्तांकडे प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश खुद्द आयुक्तांनीच सर्व खाते प्रमुख आणि उपायुक्त यांना दिले आहेत.
महापालिकेत प्रशासक असल्यापासून बरेच मोठे प्रकल्प करण्यात येत आहेत. तसेच 25 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे देखील सुरू आहेत. यामुळे या कामावर आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष देण्याचे ठरवले आहे. अशा कामांचा प्रगती अहवाल सल्लागाराच्या माध्यमातून दर 15 दिवसांनी आयुक्ताकडे सादर करावा लागणार आहे. खाते प्रमुख आणि उपायुक्त यांच्यावर ही जबाबदारी असेल.
शहरातील मोठ्या प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, त्यांच्या प्रगतीबाबत शहरातील आमदार, खासदार तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांकडून शासनाकडे तक्रारी केल्या जातात. ही कामे मुदतीत न झाल्यास त्याचा आर्थिक भारही महापालिकेस सहन करावा लागतो. अशा स्थितीत एखाद्या अडचणीमुळे प्रकल्प बंद ठेवला असल्यास अथवा त्यात वाद निर्माण झाल्यासही अनेकदा विभाग प्रमुख आयुक्तांना याबाबत कल्पना देत नाहीत. एखादी तक्रार आल्यानंतरच ही बाब समोर येते. परिणामी, या असे प्रकार रोखण्यासाठी हे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.