पुणे – 1 डिसेंबरपासून महामार्गावर प्रवास करताना टोल देण्यासाठी फास्टॅग नसल्यास टोल दुप्पट द्यावा लागणार आहे. मात्र, अद्यापही बरेच वाहनधारक याबाबत अनभिज्ञ आहे. याबद्दल संपूर्ण माहिती डिजिटल प्रभातच्या वाचकांसाठी…
फास्टॅग म्हणजे काय?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन म्हणजेच फास्टॅगच्या माध्यमातून महामार्गावर टोल संकलित करणार आहे. फास्टॅगच्या माध्यमातून रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारा वाहनाच्या समोरच्या काचेवर लावलेल्या फास्टॅगमधून टोल प्लाझावर थेट टोल घेतला जातो. त्यामुळे वाहनाला लेनमध्ये रांगेत थांबण्याची गरज पडत नाही. या फास्टॅगची वैधता खरेदी केल्यानंतर पाच वर्ष आहे. त्यात केवळ वेळोवेळी रिचार्ज किंवा टॉप करावा लागतो. या कॅशलेस व्यवस्थेमुळे रस्त्यावरील वाहतूक वेगात होईल.
फास्टॅगचे फायदे काय आहेत?
– प्रवेशावेळी रोख रक्कम लागणार नाही. वेळ वाचेल.
– टोल नाक्यावर न थांबता वाहन पुढे जाऊ शकेल. त्यामुळे इंधन वाचू शकते.
– फास्टॅगचे चार्जिंग ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनईएफटी, आरटीजीएस किंवा नेट बॅंकिंग द्वारा केले जाऊ शकेल.
– व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एसएमएस येतो. फास्टॅगमधील बॅलन्स कमी झाल्यावरही एसएमस येतो.
– वाहनांचे उत्सर्जन कमी होते. कागदाचा खर्च कमी होतो. टोलची माहिती मिळाल्यामुळे या माहितीचे विश्लेषण करून वाहतूक सुधारण्यासाठी योजना तयार केल्या जाऊ शकतात.
फास्टॅग वापरासाठी काही उत्तेजन दिली जाते का
– फास्टॅग देणाऱ्यांनी बऱ्याच कॅशबॅक योजना जाहीर केल्या आहेत.
फास्टॅग बंधनकारक आहे का
2016-17 पासून महामार्गावर फास्टॅगद्वारा टोल देण्याची सुविधा आहे. मात्र ती बंधनकारक नव्हती. मात्र 1 डिसेंबर पासून महामार्गावरील सर्वच लेन फास्टॅगसाठी तयार करण्यात आल्या आहेत. फक्त डाव्या बाजूची एक लेन हाईब्रीड आहे. आता फास्टॅग नसलेले वाहन हाईब्रीड नसलेल्या लेनमधून गेल्यास त्याला दुप्पट टोल द्यावा लागणार आहे. ही हाईब्रीडलेनही लवकरच रद्द केली जाणार आहे.
कोणत्या वाहनासाठी फास्टॅग आवश्यक आहे
महामार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी फास्टॅग वापरला जाऊ शकतो.
फास्टॅगची अंमलबजावणी कोण करीत आहे
भारतीय महामार्ग प्राधिकरण आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन या दोन संस्था टोल प्लाझा चालविणारे, फास्टट्रॅक वितरित करणाऱ्या संस्था यांच्या मदतीने याची अंमलबजावणी करीत आहे.
फास्टॅग कोणत्या महामार्गावर अंमलात येणार आहे
सध्याच्या माहितीनुसार देशातील सर्व महामार्गावर फास्ट अमलात येणार आहे. महामार्गावरील सर्व लेनमध्ये फास्टॅगच्या माध्यमातून टोल घेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. फक्त डाव्या बाजूची एक लेन हायब्रीड असणार आहे.
फास्टॅग खरेदीसाठी कोणती कागदपत्रे लागतात
फास्टॅग खरेदीसाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन मालकाचा पासपोर्ट फोटो, वाहन मालकाची केवायसी कागदपत्रे लागतात.
फास्टॅगमधून टोल घेतला आहे की नाही याची माहिती कशी मिळणार
फास्टॅग घेताना जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावर एसएमएसद्वारा याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर ग्राहकांना फास्टॅग दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर सर्व व्यवहारांचा तपशील मिळतो.
फास्टॅग नसेल तर टोल कसा दिला जाईल
फास्टॅग नसलेल्या वाहनांना डाव्या बाजूला असलेल्या हायब्रिड लेनमधून प्रवेश करावा लागेल. मात्र ते इतर लेनमधून गेल्यास नियमित दरापेक्षा दुप्पट टोल घेतला जाईल. हायब्रिड लेनही लवकरच रद्द केली जाणार आहे.
मासिक पास व स्थानिक पासची सुविधा आहे का
ही बाब स्थानिक टोल प्लाझावर अवलंबून आहे. यासंबंधात संबंधित फास्टॅग देणाऱ्या संस्थेकडे याची माहिती उपलब्ध होऊ शकते.
फास्टॅग रिचार्ज कसा केला जाऊ शकतो
धनादेश किंवा ऑनलाइन पेमेंटद्वारा रिचार्ज केला जाऊ शकतो. फास्टॅगमध्ये किमान शंभर रुपये असले पाहिजेत. त्याखाली रक्कम जाण्याच्या अगोदर रिचार्ज करणे गरजेचे आहे.
दोन किंवा अधिक वाहणासाठी एकच फास्टॅग वापरता येतो का
दोन किंवा अनेक वाहनासाठी एकच फास्टॅग वापरता येत नाही. त्यासाठी वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतात. एका वाहनासाठी घेतलेला फास्टॅग दुसऱ्या वाहनासाठी अजिबात वापरता येत नाही. प्रत्येक वाहनासाठी वेगळी केवायसी देऊन फास्टॅग घेतला असल्यामुळे तो फास्टॅग संबंधित वाहनालाच चालतो.
फास्टॅग हरवल्यानंतर काय करावे
ज्या संस्थेने फास्टॅग दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधावा आणि हरवलेला फास्टॅग ब्लॉक करावा. नवीन फास्ट घेतल्यानंतर जुन्या फास्टॅगमधील रक्कम नव्या फास्टॅगमध्ये स्थानांतरीत केली जाऊ शकते.
फास्टॅग मधून योग्य रक्कम घेतली आहे हे कसे कळेल
या संबंधातील माहिती टोल प्लाझावर असते. त्यावरून अंदाज येतो. त्याचबरोबर वेबसाईटवरही माहीती उपलब्ध असते. गरजेपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली तर फास्टॅग देणाऱ्या संस्थेला कळवून त्यात दुरुस्ती करून घ्यावी लागते.
वाहन हरवल्यास फास्टॅग भाग कसा ब्लॉक करावा
फास्टॅग देणाऱ्या संस्थेला कळवून फास्टॅग ब्लॉक केला जाऊ शकतो. फास्टॅग सर्व हायवेवर फास्टॅग चालतो. मात्र त्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या एजन्सीकडून फास्टॅग घेतला आहे त्यांना कळवावे लागते. वाहन विक्री केल्यास फास्टॅग देणाऱ्या संस्थेला कळवावे लागेल. फास्टॅग खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास ताबडतोब फास्टॅग देणाऱ्या संस्थेला कळवावे लागेल व नवा फास्टट्रॅक घ्यावा लागेल.
हायवे वरील फास्टॅग इतर रस्त्यावर चालतो का
सध्या राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग यंत्रणा आहे. मात्र सर्व राज्यांच्या रस्त्यावर त्याचबरोबर पार्कीगसारख्या ठिकाणीही फास्ट टॅग विस्तारित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
फास्टॅग संदर्भात काही तक्रार असल्यास काय करावे
सुरुवातीला फास्टॅग वितरित करणाऱ्या संस्थेकडे विचारणा करावी. तरीही मतभेद न मिटल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा पर्याय आहे.