अजित पवारांना द्यायचं काय ? पक्षनेतृत्वापुढे पेच

खातेवाटपात जुन्या जाणत्या प्रभावशाली नेत्यांचा सन्मान कायम ठेवण्याचे आव्हान

पुणे : कॉंग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर येऊन दिवस उलटला असला तरी अजित पवार यांनी काही काळ घेतलेली फारकत आणि त्यांचं परत येणं, कसे हाताळावे याबाबत राष्ट्रवादीतील गोंधळ पुरता मिटलेला नाही. त्यामुळेच पक्षातील उपमुख्यमंत्री पदाचे नाव आणि महत्वाच्या खात्यांचे मंत्री पदे कोणाला द्यायची, याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही, असे राष्ट्रवादीतील वरीष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वसतुत: अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाचे हक्कदार आहेत. मात्र, भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे धाडस त्यांच्या अंगाशी आले आहे. जरी ते पक्षात परत आले असले तरी त्यांना तातडीने तेच पद मिळणे दूरापास्तच असल्याचे मत या नेत्याने व्यक्त केले.

मी पक्षात होतो आणि आहे. पण मी आज शपथ घेणार नाही. पदे आणि खाती या संबंधात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यावरून पक्षात खात्यांचा आणि विशेषत: अजित पवार यांचा सन्मान ठेवताना त्यांच्याकडे सर्वोच्च पद जाणार नाही, याची दक्षता पक्षनेतृत्व घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मते, अजित पवार यांना अर्थ किंवा गृह यासारखे महत्वाचे खाते देण्यात येईल. कारण बंडानंतरही मास लिडर म्हणून अजित पवार यांचे स्थान कायम आहे. पक्षातील आमदारांना सांभाळण्याची वेळ येईल, तेंव्हा ते महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे या नेत्याने सांगितले.

पक्षातील आणखी एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार हे अजित यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार नाहीत. पक्षाच्या आदेशाच्या उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी अजित पवार यांना दिला आहे.

पक्षातील सत्तेचा आणि नेत्यांच्या सन्मानाचा समतोल राखण्याचे खरे आव्हान पक्ष नेतृत्वापुढे आहे. राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्यांमधील संघर्षाचे उदाहरण दिले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात 2009 मध्ये संघर्ष उडाला. तोपर्यंत जयंत पाटील यांच्याकडे गृह आणि अर्थ अशी खाती होती. त्यांना त्यांतर ग्रामविकास खाते देण्यात आले होते. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे उर्जा, उच्च वैद्यकीय शिक्षण आणि अर्थ अशा महत्वाच्या खात्यांचा कार्यभार होता. त्यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.