एक्‍सपायरी डेट म्हणजे नक्की काय?

पुणे – एक्‍सपायरी डेट म्हणजे नेमके कुठली दिनांक? याचा नेमका अर्थ काय? याचा औषधांशीच संबंध कशामुळे? अजून कुठल्या पदार्थांवर असा दिनांक असतो? हा दिनांक नेमका कोण ठरवतो? या दिनांकानंतर औषधे वापरली तर काय होऊ शकते? अशी औषधे परिणामकारक राहत नाहीत काय? असे या प्रश्नांचे स्वरूप आहे.त्यांमुळे आज आपण या लेखाच्या माध्यमातून यासंबंधी माहिती घेणार आहोत.

एक्‍सपायरी डेट हा औषधी वापरामधील एक परवलीचा शब्द आहे. औषधांच्या वापरासंबंधी कालावधी दर्शविणारा हा दिनांक असून औषधांबरोबरच विविध खाद्य पदार्थ, सौन्दर्य प्रसाधने व रासायनिक पदार्थांच्या आवरणावर या दिनांकाचा उल्लेख असतो. या वस्तूंचा वापर करणाऱ्या सर्व सामान्य माणसास या दिनांकाचे मोठे कुतूहल असते. सुशिक्षित जाणती माणसे वस्तू खरेदी करत असताना या दिनांकाचा उल्लेख तपासत असल्याचे पाहण्यात येते. सर्वसामान्य व्यक्‍तींना यासंबधी अनेक प्रश्न पडतात.

औषधांची एक्‍सपायरी डेट म्हणजे औषध निर्माण कंपनीकडून ठरवली जाणारी एक अंतिम दिनांक असून औषध निर्माण कंपनी या दिनांकपर्यंत औषधाच्या सुरक्षिततेची व परिणामकारकतेची ग्वाही देते. याचा अर्थ असा की, औषध निर्माता कंपनी औषध निर्माण केल्यानंतर औषध वापराचा कालावधी निश्‍चित करते .ते औषध त्याच कालावधीत वापरले जावे, यासाठी त्याचे मुद्रण औषधांच्या आवरणावर केले जाते.
कायद्याने असा उल्लेख करणे औषध निर्माता कंपनीस बंधनकारक आहे.

हा उल्लेख अगदी स्पष्ट व नेमकेपणाने केला जातो. औषधांप्रमाणेच विविध खाद्यपदार्थ उत्पादने, सौंदर्य प्रसाधने व रासायनिक उत्पादने यांच्यावर देखील एक्‍स्पायरी (expiry date) डेटचा उल्लेख आढळतो .या ठराविक पदार्थावरच हा उल्लेख का आढळतो? असा प्रश्‍न पडणे साहजिक आहे. उपरोल्लेखित पदार्थ हे विविध रासायनिक व जैविक घटक पदार्थांपासून बनवले जातात. अशा घटक पदार्थांचा सक्रिय राहण्याचा कालावधी हा अत्यंत कमी असू शकतो.

त्याबरोबरच या पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन असे पदार्थ निष्क्रिय होऊ शकतात. त्यामुळेच या पदार्थांवर एक्‍स्पायरी डेटचा (expiry date) उल्लेख आवश्‍यक ठरतो. हे सर्व पदार्थ मनुष्याच्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे त्यांचा आरोग्यावर योग्य परिणाम होतो अथवा नाही याचा विचार करूनच यांची एक्‍स्पायरी डेट (expiry date) ठरवली जाते.औषधांच्या आवरणावर या बरोबरच औषध निर्मितीचा दिनांक : मॅन्युफॅक्‍चरिंग डेट, मॅन्युफॅक्‍चरिंग बॅच, औषधाचे वर्गिकरण, किंमत इ. तपशिलाचा समावेश असतो.

एक्‍सपायरी डेटचा उल्लेख विविध ठिकाणी विविध पद्धतीने केला जातो. उदा.एक्‍सपायरीडेट, एक्‍सपायरी,एक्‍स,युज बाय, युज बिफोर. काही देशांमध्ये औषधी तज्ज्ञांकडून “डिसकार्ड आफ्टर सेवन डेज ऑफ ओपनिंग’ अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्या जातात. या सूचना एक्‍सपायरी डेटच्या निदर्शक असतात. काही अन्नपदार्थामध्ये “बेस्ट बिफोर’ असाही उल्लेख एक्‍स्पायरी डेट (expiry date) बाबत आढळतो .

या दिनांकाच्या उल्लेखामध्ये सहसा दिनांक, महिना व वर्ष असा उल्लेख असतो. कांही ठिकाणी दिनांक न वापरता फक्त महिना व वर्ष असाही उल्लेख केला जातो. एक्‍सपायरी डेटचा अर्थ असा आहे की औषधे त्या विशिष्ट दिनांकानंतर घेतली जाऊ नयेत. या दिनांकामुळे सुरक्षित व परिणामकारक औषधांची मुदत रुग्णांना व औषधी विक्रेत्यांना लक्षात येते व रुग्णांकडून त्या मुदतीत औषधी वापर केला जाऊ शकतो.
हा दिनांक ठरवत असताना औषध निर्माता कंपनीकडून विविध घटकांचा विचार केला जातो.

हे घटक पुढीलप्रमाणे : 

औषधांचे विविध प्रकार : अँटीबायोटिक्‍स, आय ड्रॉप्स, संयुक्‍त औषधे यामध्ये वापरलेल्या औषधी द्रव्याचा कालावधी कमी असल्यामुळे या औषधाची एक्‍सपायरी डेट कमी कालावधीची असते. अँटीबायोटिक्‍स म्हणजेच प्रतिजैविके यांच्यामध्ये विविध जैविक घटक सामावलेले असतात. त्यामुळे अशा औषधांचे विघटन लवकर होण्याची शक्‍यता असते. 

औषधांचे स्वरूप: द्रव औषधी पदार्थांचे विघटन स्थायु औषधांच्या तुलनेने लवकर होण्याची शक्‍यता असते. संयुक्‍त औषधी ज्यामध्ये अनेक औषधी घटक द्रव्य एकत्रित असतात. अशा पदार्थांचे विघटन ही लवकर होते.

औषधांची साठवण: तापमान, हवेतील आर्द्रता यासारखे घटक औषधांमध्ये भौतिक व रासायनिक बदल घडऊ शकतात. त्यामुळे अशा औषधांची विघटन लवकर होण्याची शक्‍यता असते.

औषधांचा वापर : सर्वसाधारणपणे द्रव पदार्थांच्या एकाच औषधी युनिटचा वापर वारंवार केला जातो. त्यामुळे त्या औषधांचा हवेशी संपर्क येऊन त्यांचे लवकर विघटन होण्याची शक्‍यता वाढते. आयड्रॉप सारखे औषधी पदार्थ डोळ्याच्या संपर्कामध्ये येण्यामुळे त्यांच्यामध्ये देखील लवकर विघटन होण्याची शक्‍यता वाढते. तांत्रिक दृष्टीने एक्‍स्पायरी डेट (expiry date) ठरवण्यासाठी औषधांच्या शेल्फ लाइफ पीरियडचे विचार केला जातो.

औषधी तयार करताना त्यामध्ये वापरले जाणारे घटक पदार्थ, त्यांचे स्वरूप, त्यांचे जैविक व अजैविक घटक पदार्थ यासारख्या घटकांचा विचार करून त्या औषधांचा शेल्फ लाईफ पिरियड ठरत असतो.
एक्‍सपायरी डेट नंतर ही औषधे न वापरता त्यांची व्यवस्थित व योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.

या दिनांकानंतर ही औषधे परिणाम शून्य होण्याची शक्‍यता असते अथवा या औषधांचे शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे एक्‍सपायरी डेट संपलेल्या औषधांचा वापर करू नये. यासंबंधी औषधी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरतो. अशी एक्‍सपायरी डेट संपलेली औषधांची औषधी तज्ज्ञांकडून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

सामान्य व्यक्तीकडून स्वनिर्णीत औषधोपचारांमध्ये  औषधांचा वापर करीत असताना एक्‍स्पायरी डेट बाबत चुका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे स्वनिर्णीत औषधोपचारादरम्यान याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्‍यक आहे. या कारणामुळे देखील स्वनिर्णीत औषधोपचार अडचणीचे ठरू शकतात. सर्वसाधारण स्वनिर्णीतऔषधपचारामध्ये विविध द्रव औषधी पदार्थ वारंवार वापरले जातात.त्यावेळी त्याची एक्‍स्पायरी डेट पाहणे अत्यावश्‍यक आहे .

एक्‍स्पायरी डेट संदर्भात ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमियोपॅथिक, हर्बल, युनानी अशा विविध औषधांसंदर्भात विविध संकल्पना आहेत .परंतु त्यांचाही विचार औषधी वापर करताना करणे आवश्‍यक आहे. एकूणच या संबधी औषधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक आहे.

– प्रा. नरहरी पाटील

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.