सिनेसृष्टीत अलीकडील काळात नायिकांचा भरणा इतका झाला आहे की, कित्येकींची नावेही लोकांना माहीत नसतात. अनेक अभिनेत्री येताहेत आणि जाताहेत. अर्थात पूर्वीही हा सिलसिला असायचाच; पण आता त्यातील संख्या वाढली आहे. त्यामुळेच एखादा जुना (काही महिन्यांपूर्वीचा) चित्रपट पाहताना “अरे ही अभिनेत्री पुन्हा कुठे दिसली नाही’ असा विचार मनात येतो.
हुमा कुरेशीचेच उदाहरण घ्या ना! अलीकडेच हुमाने “आर्मी ऑफ द डेड’ या अमेरिकन थ्रीलर चित्रपटाचे चित्रीकरण आटोपले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर यावर्षीच्या मध्यापर्यंत प्रदर्शित होईल. रुपेरी पडद्यावर झळकणारा एकही चित्रपट सध्या तरी हुमाकडे नाही. पण अशा गोष्टींना ती महत्त्व देत नाही.
सतत काही ना काही करत राहणं, कार्यरत राहणं हा हुमाचा स्थायीभाव आहे. त्यानुसार ती छोटी-मोठी कामं करत असते. सध्या ती एका डॉक्युमेंट्रीच्या कामात व्यस्त आहे. याखेरीज काही स्वयंसेवी संस्थांबरोबरही ती काम करताना दिसतेय. समाजासाठी काही करण्यात एक वेगळाच आनंद असतो, असं हुमा सांगते.
यासाठी ती आपल्या व्यावसायिक कामातून आवर्जून वेळ काढते. कोणत्याही सामाजिक संस्थेने तिला मदतीबाबत, सहकार्याबाबत, सहभागाबाबत विचारणा केली की लागलीच ती तयार होते. विशेष म्हणजे, आपल्या या स्वभावामुळे हुमा आज कित्येक स्वयंसेवी संस्थांशी जोडली गेलेली आहे. याचा नेमका आकडा तिलाही माहीत नाही!