उद्घाटन होऊनही स्थलांतर होण्यासाठी अद्याप मुहूर्ताचीच प्रतीक्षा
पिंपरी – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या गेल्या दीड दशकामध्ये प्रचंड वाढली आहे आणि रोज वाढत आहे. शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन शहरात ठिकठिकाणी रुग्णालये उभारली आहेत. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रुग्णालयांचा नागरिकांना पूर्ण क्षमतेने लाभ घेता येत नाही. तयार झालेली रुग्णालये आणि काम संथगतीने सुरु असलेल्या रुग्णालयांचा दैनिक “प्रभात’ने घेतलेला आढावा.
पिंपरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीत जिजामाता रूग्णालयाचे कामकाज सुरू होण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. सध्या कमला नेहरू शाळेतच रुग्णालय सुरू आहे. नवीन इमारतीत रुग्णालय स्थलांतरासाठी सध्या केवळ “तारीख पे तारीख’ पडत आहे. त्यामुळे रूग्णांची मात्र चांगलीच परवड होत आहे.
जिजामाता रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे. जुन्या इमारतीत अपुरी जागा उपलब्ध होती. तसेच, पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. पिंपरीतील जयहिंद शाळेसमोर जिजामाता रुग्णालयाची तळमजल्यासह चार मजली नवीन इमारत सध्या बांधून तयार आहे. या इमारतीचे उद्घाटन सप्टेंबर-2019 मध्ये तत्कालीन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप संबंधित इमारतीत रूग्णालय स्थलांतर झालेले नाही. रूग्णालयातील फर्निचरचे काम पूर्ण झाले आहे. मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे.
अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था केली आहे. त्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला मिळालेला आहे. कम्पाऊडचे काम मात्र बाकी आहे. नवीन रूग्णालय इमारतीत एकूण 100 खाटांची सोय असणार आहे. रूग्णालय उभारणीसाठी 36 कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. 6 हजार 719 चौरस मीटर जागेत हे बांधकाम करण्यात आलेले आहे.
बाह्यरूग्ण विभाग सुरू करणार
रूग्णालय इमारतीत पहिल्या टप्प्यात बाह्यरूग्ण विभाग, प्रसुतीगृह, शस्त्रक्रिया कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. बाह्यरूग्ण विभागात 7 तपासणी कक्ष असणार आहेत. त्याशिवाय, फार्मसी, कुटुंब कल्याण केंद्र, लसीकरण केंद्र, डॉट्स उपचार, 10 खाटांचा महिला प्रसूतीगृह, एक शस्त्रक्रिया कक्ष आदी सुविधा नियोजित आहेत. संबंधित रूग्णालय सर्व सुविधांसह सुरू केल्यास पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयावरील ताण कमी होणार आहे. नवीन रूग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी, वाकड आदी भागातील नागरिकांची चांगली सोय होऊ शकणार आहे
रुग्णालयासाठी मानधनावरील डॉक्टर
कमला नेहरू शाळेत सध्या सुरू असलेल्या रूग्णालयासाठी 1 ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, 3 वैद्यकिय अधिकारी कायमस्वरूपी तत्त्वावर कार्यरत आहेत. येथे मानधन तत्त्वावर 1 वैद्यकिय अधिकारी, 1 दंत चिकित्सक, 1 निवासी वैद्यकिय अधिकारी रूजू झाले आहेत. अद्याप आणखी काही डॉक्टर घेणे बाकी आहे.
जिजामाता रूग्णालयासाठी आवश्यक नवीन डॉक्टर व अन्य कर्मचारी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करून नव्याने उभारलेल्या रूग्णालय इमारतीत लवकरात लवकर जिजामाता रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
जिजामाता रूग्णालयासाठी आवश्यक नवीन डॉक्टर व अन्य कर्मचारी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही शिल्लक राहिलेली कामे पूर्ण करून नव्याने उभारलेल्या रूग्णालय इमारतीत लवकरात लवकर जिजामाता रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.