शारजा – गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा अवघ्या 3 धावांनी पराभव केला.
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 20 षटकांत 5 बाद 139 धावांवर रोखला गेला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन व रॉस्टन चेस यांनी केलेल्या जबाबदार खेळीच्या जोरावर 20 षटकांत 7 बाद 142 धावांची मजल मारली. या डावात त्यांचे प्रमुख फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. कर्णधार कॅरन पोलार्ड याने तर संथ फलंदाजीमुळे चक्क निवृत्ती घेतली. तो जखमी निवृत्त झाला की जखमी बाद हा प्रश्न निर्माण झाला होता.
सामनाधिकारी व पंचांशी झालेल्या चर्चेनंतर तो जखमी निवृत्त असल्याचे सांगितले गेले. पुढे चार फलंदाज बाद झाल्यावर तो पुन्हा एकदा फलंदाजीला आला व त्याने षटकारही फटकावला. मात्र, बाकी फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांना मोठी मजल मारता आली नाही. बांगलादेशचा डाव सुरू झाल्यावरही त्यांच्याही फलंदाजांनी निराशा केली. एकवेळ बांगलादेशचा मोठा पराभव होणार असे दिसत असतानाच लिटन दास व कर्णधार महंमदुल्लाहने आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडिजवर दडपण टाकले.
अखेरच्या षटकांत बांगलादेशला विजयासाठी 13 धावांची गरज होती. आंद्रे रसेलने हे षटक अत्यंत भेदक टाकले. महंमदुल्लाह व असिफ हुसेन यांनी कमालीचा प्रतिकार केला मात्र, त्यांना विजयापासून केवळ 3 पावले दूर राहावे लागले. लिटन दासने 44 धावांची खेळी करताना महंमद नईम व सौम्य सरकारच्या साथीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही त्याने महंमदुल्लाहसह 40 धावांची भागीदारी केली. मात्र, तो बाद झाला व त्यांच्या नंतरच्या फलंदाजांवर दडपण आले व अखेर हा सामना त्यांनी 3 धावांनी गमावला.
संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज – 20 षटकांत 7 बाद 142 धावा. (निकोलस पूरन 40, रॉस्टन चेस 39, जेसन होल्डर नाबाद 15, कॅरन पोलार्ड नाबाद 14, शेरीफुल इस्लाम 2-20, मेहदी हसन 2-27, मुस्तफिजूर रहिम 2-43). बांगलादेश – 20 षटकांत 5 बाद 139 धावा. (लिटन दास 44, महंमदुल्लाह नाबाद 31, असिफ हुसेन नाबाद 8, जेसन होल्डर 1-22, अकिल हुसेन 1-24, रवी रामपाल 1-25).