IPL 2024, CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. रुतुराज गायकवाडचा संघ शुक्रवारी चौथा सामना खेळताना दिसणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा एक गोलंदाज मायदेशी परतला आहे. व्हिसाच्या समस्येमुळे तो मायदेशी परतला असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने संघाने जिंकले आहेत, तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आता संघाच्या नजरा हैदराबादचा किल्ला फोडण्यावर असतील, मात्र या सामन्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
चेन्नईचा हा खेळाडू परतला मायदेशी….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नईचा किलर बॉलर मुस्तफिजुर रहमान ( Mustafizur Rahman ) बांगलादेशला परतला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी व्हिसाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तो मायदेशी परतला आहे.
या अहवालात बीसीबी ( Bangladesh ) क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी म्हटले आहे की, “मुस्तफिझूर काल रात्री आयपीएलमधून आगामी T20 विश्वचषकासाठी यूएस व्हिसाच्या उद्देशाने पोहोचला आहे. तो उद्या (4 एप्रिल) यूएस दूतावासात त्याच्या बोटांचे ठसे देईल आणि नंतर चेन्नईमध्ये सामील होण्यासाठी भारतात परतेल.”
पर्पल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिझूर अव्वल …
28 वर्षीय खेळाडूने आयपीएलच्या 17 व्या हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने सीएसकेसाठी तीन सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रहमानने आतापर्यंत एकूण सात विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात एका विकेटसाठी 47 धावा दिल्या होत्या.
30 एप्रिलनंतर सोडणार सीएसके….
अहवालात पुढे म्हटले आहे की, मुस्तफिझूर एप्रिल अखेरपर्यंत आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज झिम्बाब्वेविरुद्ध 3 मेपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसेल. मुस्तफिझूरने 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत.