नागठाणे -सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अश्विनी माने (मूळ रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) यांचा विवाह सोहळा उद्या, दि. 3 रोजी हिंगणगाव (ता. फलटण) येथे होणार आहे. विवाह सोहळ्याला काही तासांचा अवधी असूनही लॉकडाऊनमुळे त्या काल (दि. 1 कर्तृव्यावर हजर होत्या. त्यांना घरी जायला बुधवारी (दि. 1) रात्री उशीर होणार असल्याने इतर महिला कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत अश्विनी यांच्या हातावर मेंदी काढली.
खरे तर विवाहासाठी अश्विनी माने यांना काही दिवसांपूर्वी सुट्टीवर सोडणे आवश्यक होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये सर्व पोलिसांच्या सुट्ट्या, रजा रद्द करण्यात आल्याने अश्विनी माने या गेल्या दहा दिवसांपासून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या विवाहाच्या मुहूर्ताला काही तासांचा अवधी असतानाही त्या बुधवारी सकाळी कर्तव्यावर हजर राहिल्या होत्या. त्यांनी सायंकाळी लग्नासाठी रजेचा अर्जही सादर केला होता.
लग्नापूर्वीचे काही विधी व हातांवर मेंदी काढण्यासाठी नववधूने घरी असणे अपेक्षित होते; परंतु त्यांना घरी जायला रात्री उशीर होणार असल्याने हे शक्य नव्हते. बोरगाव पोलीस ठाण्यातील इतर महिला कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी बुधवारी रात्री एकीकडे आपले कर्तव्य बजावत दुसरीकडे नववधू अश्विनी माने यांच्या हातावर मेंदी काढली. पोलीस ठाण्यातील पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.