– विजय लाड
कोयनानगर – सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यातून पाटण तालुक्यात तब्बल ६७ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावून तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यात येणार आहे. यामुळे निसर्गसंपन्न असणारे कोयना व पाटणचे पर्यटन समृध्द होणार आहेत.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दि. २२ रोजी झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या एकात्मिक विकास आराखड्यास मान्यता देऊन सुमारे ३८१ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.
या आराखड्यात पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र राखीव व वन क्षेत्रातील पर्यटन विकास, तसेच कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटन यांच्या कामांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव व वन क्षेत्रातील पर्यटन विकासासाठी कुसवडे- कारवट, कोयना- हेळवाक, पाणेरी व भोसगाव आदी विभागांत निसर्ग पर्यटनास पूरक कामे करण्यात येणार आहेत.
त्यातून प्रामुख्याने प्रेक्षागृह, तंबू निवास, सोलर लाइट, फ्लोटिंग जेट्टी, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटक सफारीकरीता वाहने, बालोद्यान आदी विविध सुविधा दोन वर्षांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोयना-हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पाटण तालुक्यात विकासकामे करण्यात येणार आहेत. यात कोयना ते कृष्णा नदीपात्रातील हेळवाकपासून मल्हारपेठपर्यंत ४१ किलोमीटर लांबीचे नदीपात्र जलपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. त्यात रॅम्प, पॅव्हिलियन, फ्लोटिंग जेट्टी, जेट स्की आदी सुविधांसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
निसर्ग पर्यटनाला पूरक विकासकामे व सुविधांमुळे पाटण तालुक्यातील पर्यटनास चालना मिळेल. तालुक्यात यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. तालुक्यातील अनेक पर्यटनक्षेत्र विकसित करुन पर्यटन विकासात तालुका समृध्द करण्यावर आपला भर राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
– शंभूराज देसाई ( पालकमंत्री सातारा )