‘तू जा रे, आम्ही लय टपकवलेत तुझ्यासारखे…’; चोरी करण्यापासून रोखल्याने तरुणावर चाकूहल्ला

पुणे – गाडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखल्याने एका नागरिकाच्या पोटात चोरांनी दोनदा चाकू खुपसला. ही घटना नऱ्हे येथील भूमकर चौकात घडली. याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल घारे (29,रा.भूमकर चौक, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत त्यांचे पती प्रमोद जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रमोद हे एका खासगी कंपनीत अकाऊंटंटचे काम करतात. त्यांच्या मालकीची स्विफ्ट कार आहे. पहाटे पावणेचारच्या सुमारास त्यांनी गॅलरीतून खाली पाहिले असता, त्यांना कोणतरी त्यांच्या गाडीचे लॉक उघडत असल्याचे दिसले.

प्रमोद यांनी खाली जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना हाताने मारहाण करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिकार केला असता, कंपाऊंड वॉलवरुन आणखी तीघे सोसायटीमध्ये घुसले. त्यांनी प्रमोदला तु इथून निघुन जा, नाहीतर आम्ही तुला मारुन टाकील, आम्ही लय टपकवलेत तुझ्या सारखे, आमच्या हातून मरु नको, अशी दमदाटी केली.

इतक्‍यात त्यातील एकाने त्याच्या हातातील चाकूने प्रमोदच्या पोटात दोनदा भोसकले. प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर पत्नी व इतरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संकपाळ करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.