जातेगावमध्ये घबराट : शेजारील दोन घरे फोडली
शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करताना ज्येष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. चोरट्यांनी शेजारील दोन ठिकाणी घरफोडी केली आहे. या घटनेने शिरूर तालुक्यात घबराट पसरली आहे.
कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६, रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर), असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. जातेगाव बुद्रुक येथील नंदा इंगवले या जेवण केल्यानंतर शेजारील घरात झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची सासू जुन्या घरात झोपली असल्याने नंदा यांनी जुन्या घराच्या सुरक्षा दरवाजाला कुलूप लावले. सकाळी नंदा या सासूबाई यांच्या जुन्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडण्यासाठी गेल्या.
कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी सासूबाईंना हाक मारली. मात्र, प्रतिसाद न आल्याने त्यांनी आतमध्ये पाहिले असता कृष्णाबाई या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसल्या. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कृष्णाबाई इंगवले यांचा चोरट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले.
इंगवले यांच्या घरातून दोन ताळे दागिने, तीन हजार रुपये रोकड, असा ऐवज लुटला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारील मोहन तांबे व दत्तात्रय फणसे यांच्या घरात हात साफ केले. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले आहे. नंदा इंगवले यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांवर खुनासह चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दहा वर्षापूर्वीच्या घटना ताजी
कृष्णाबाई इंगवले यांचे कुटुंबीय जून २०१४ मध्ये देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन त्यांचे पती, दोन मुले, दोन मुली, नातू अशा सहा जणांसह अन्य एकाचा मृत्यू झाला होता. कुटुंबात कर्ता पुरुष राहिला नसताना कृष्णाबाई यांनी सुना व नातवांना घेऊन कुटुंब पुढे नेले. मात्र, आज अचानक घडलेल्या घटनेने जातेगावकरांना दहा वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण झाली आहे.