पुणे पालिकेत येऊनही लोहगावची उपेक्षाच…

लोहगाव उपनगर वार्तापत्र : प्रकाश बिराजदार

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ म्हणून लोहगावची ओळख आहे. याच गावात छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांची कीर्तने ऐकायला येत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हवाईदलाचे (एअरफोर्स) विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील येथेच आहे. अशी पार्श्‍वभूमी असलेल्या या गावचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित होते. ग्रामपंचायत असताना विकास होत नसल्याने गाव पालिकेत समाविष्ट व्हावे, असे स्थानिक राजकीय नेते व नागरिकांना देखील वाटत होते. ऑक्‍टोबर 2017 मध्ये लोहगावचा महापालिकेत समावेश झाला. परंतु गावाचा पालिकेत समावेश होऊन तब्बल सव्वाचार वर्षे झाली, मात्र विमानतळालगत असलेल्या परिसरातील रहिवाशांना पालिकेच्यावतीने मूलभूत सुविधासुद्धा मिळत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पालिकेत जाण्याच्या पूर्वीपासूनच आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक अर्धा-एक गुंठा जागा घेऊन स्वप्नातील घर बांधून वास्तव्य करत होते. तसेच लोहगाव हे विमानतळालगत व शहराजवळ असल्याने परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालयांनी एकरांवर जमिनी खरेदी करून आपले बस्तान बसवले.

पुढे बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग बहुमजली गृहप्रकल्प विकसित केले. गृहप्रकल्पांच्या अंतर्गत परिसरात सुविधा असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी अनेक समस्या आहेत. गावठाणासह लोहगावच्या उपनगरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना देखील पाणी, ड्रेनेज, पथदिवे, रस्ते, कचरा, आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेत समाविष्ट होण्याअगोदर ग्रामपंचायतच्यावतीने दिलेल्या सोयी-सुविधाच नागरिकांना आजतागायत मिळत आहेत.

भामा-आसखेड प्रकल्पामुळे लोहगावकरांना दहा-पंधरा दिवसांनी मिळणारे पाणी एक दिवसाआड मिळू लागले. कर्मभूमीनगर, आदर्शनगर, संतनगरचा काही परिसर, पवारवस्ती, खंडोबामाळ, निरगुडी रस्ता, वाघोली रस्ता, मोझेनगर, निंबाळकरनगर, जनार्धननगर, वडगावशिंदे रस्ता, अष्टविनायक सोसायटी, लेक व्ह्यूव्ह सिटी आदी भागांमध्ये जलवाहिन्याच नसल्याने भामा-आसखेडचे पाणी आले असले, तरी त्या भागातील नागरिकांना आपली तहान भागवता येत नाही. त्यांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगाव मुख्य चौकातील टाकीजवळच्या नळाचे पाणी कॅनमध्ये घेऊन जावे लागते अथवा दारात आलेल्या टेम्पोतून वीस लिटरसाठी दहा-वीस रुपये मोजावे लागतात. तसेच वापरण्यासाठी देखील आठशे ते हजार रुपये देत टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागते.

कचऱ्याचा प्रश्‍न कायम
येथील नियमित कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत काळात असलेली वाहनेच आहेत. त्यांची संख्या कमी असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. सर्वच भागात पुरेशा व्यासाच्या मलवाहिन्या देखील नाहीत. रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.