काळजी घ्या ‘तो’ परत येतोय ! निष्काळजीपणामुळे करोनाचा संसर्ग वाढला

* आंबेगाव तालुक्‍यातही निर्बंधांबाबत प्रशासन जागरूक * नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांत करोनाचा प्रसार वाढला असून, मोठ्या प्रमाणात करोनाबाधित रुग्ण आढळलू लागले आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कडक नियम लागू केले आहेत; परंतु नागरिकांचा निष्काळजीपणा रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्‍यात सध्या सर्व ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरू झाली असून, नागरिक कुठल्याही प्रकारे मास्कचा वापर न करता गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच लग्नसोहळे, वाढदिवस या कार्यक्रमांनाही मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ढेबे या ठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या कायद्यांचे पालन तंतोतंत न करणे हे करोनाचा प्रसाराला कारण ठरले आहे.

सध्या नागरिकांवर कडक निर्बंध लावण्याची वेळ आली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर करोनाची दुसरी लाट येऊ शकते आणि याचा फटका सामान्य नागरिकांपासून मोठ्या उद्योजकांनाही बसू शकतो, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अवसरी खुर्द येथील शासकीय महाविद्यालयामध्ये कोव्हिड केयर सेंटर 31 जानेवारीपासून बंद आहे, तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयात 43 रुग्ण उपचार घेत आहेत. येथील ऑक्‍सिजन बेडची संख्या 100 आहे. करोनाचे रुग्ण गेल्या आठ दिवसापासून वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
– डॉ. अंबादास देवमाने, वैद्यकीय अधीक्षक, मंचर उपजिल्हा रुग्णालय

नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे करोनाचा प्रसार वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या दिवसागणिक बाधितांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध पुन्हा लागू केले आहेत, तसेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची पावले उचलली जाण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्यती खबरदारी तालुक्‍यातही घेणे गरजेचे आहे. अन्यथा येथेही पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.
– जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी

पुणे जिल्ह्यातील रात्र संचारबंदीबरोबर जिल्हा परिषद शाळा 28 तारखेपर्यंत बंद राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावोगावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विवाहसोहळे, दशक्रिया, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम यांनाही 200 पेक्षा जास्त लोकांना बंदी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही या गोष्टींबाबत दक्षता घेतली जात आहे.
– विशाल करंडे, उपसरपंच, काठापूर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.