मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी विरोध करण्यास सुरु केले आहे. भाजपाने या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली असताना आता राज्य सरकारकडून देखील या निर्णयाविषयी स्पष्टीकरण देण्यात येत आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही कुणाला वाईन प्या, असे म्हणू शकत नाही आणि म्हणणार देखील नाही. कारण मद्यपान करू नये, हाच महत्वाचा विषय आहे. सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच, तरीही जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात. मद्यपान हानिकारक आहेच, त्याविषयीची जागृती आपण करत असतो. वाईन उद्योगाला द्राक्ष बागायतदारांच्या उत्पादकतेसंदर्भातील दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलंय. मद्यपानास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला नाही,” असे वक्तव्य आरोग्य मंत्री यांनी केले .
“शेतकरी द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही,” अशीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.