पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व देहू नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नागरी सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे मावळमधील देहू इथं व्यासपीठावरुन बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोबाईलमुळे होणारी अडचण व्यक्त केली,
त्या म्हणाल्या,’एखादा नेता आपल्या मतदारसंघात, कार्यकर्त्यांसोबत काहीतरी बोलत असतो. त्याचा व्हिडीओ दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाहेर येतो आणि तो मोठ्या अडचणीत सापडतो. उदाहरण द्यायचेच झाले तर म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील एका गावात नाना तथाकथित गावगुंड मोदीबाबत काहीतरी बोलले आणि अख्खी भाजप त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली! सांगायचा मुद्दा हा की मोबाईल हा जेवढा सोयीचा तेवढाच तो अडचणीचा ठरतोय.
त्या पुढे म्हणाल्या,’ मोबाईलमुळे नेतेमंडळींसमोर कशाप्रकारे अडचण निर्माण झाली आहे ते बोलून दाखवलं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला होता.
दरम्यान, खासदार सुळे म्हणाल्या की, आमदार सुनील शेळके हे नेहमीच विकास कामांसाठी आग्रही असतात. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत घेऊन देहूकारांच्या सर्व समस्या सोडवाव्यात. तसेच विकासकामे करत असताना देहू शहराची असलेली ऐतिहासिक ओळख कायम ठेवावी. देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक येत असतात. यामुळे आयुष्यात एकदा तरी देहूला जावे, असे परराज्यातील नागरिकांना वाटले पाहिजे, अशी क्षेत्र देहू शहराची ओळख बनवू. महाराष्ट्रातील संतांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी कार्य करा. प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करा, असे आवाहन देखील यावेळी खासदार सुळे यांनी नागरिकांना केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबन भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, वैशाली टिळेकर व राष्ट्रवादीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी देहू शहरात आल्यावर प्रथम विठ्ठल मंदिर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर विकास कामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.