मायणीकरांचा पाणीपुरवठा बारा दिवसांपासून बंद

महेश जाधव

मायणी –
मायणी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या येरळवाडी, ता.खटाव येथील प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेची मोटर बारा दिवसापूर्वी जळाली असून मायणीकरांचा बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने मायणी ग्रामस्थांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत.

वस्तीवरील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे वातावरण असून मायणीमध्ये यशवंत बाबा महाराजांची यात्रा सुरू आहे. या यात्रांमध्ये जनावरांचा मोठा जंगी बाजार असतो. परंतु ग्रामपंचायतीने केलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने यात्रेत आलेली बरीच जनावरे केवळ दोनच दिवस थांबून तिसऱ्या दिवशी निघून गेली आहेत. त्यामुळे यात्रेमधील जनावरांच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने काहीही करून मायणीकरांची व यात्रेकरूंची तहान भागवण्यासाठी टॅंकरच्या अधिक फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे.

येरळवाडी, ता खटाव येथे संपूर्ण मायणी गावाला पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना असून येथील 90 हाऊस पॉवरची मोटर अचानक बारा दिवसांपूर्वी अचानक जळाली असून त्यामुळे यशवंतनगर, माळीनगर, फुलेनगरनगर, श्रीराम कॉलनी, शिक्षक कॉलनी सराटे मळा, इंदिरानगर, नवीन गावठाण, नदाफ कॉलनी या भागात गेले बारा दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. त्यामुळे येथील भागातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.

दोन वर्षापूर्वी सरपंच प्रकाश कणसे यांनी बदाचा मळा या ठिकाणी असलेल्या शेवाळे यांच्या विहिरीतून मायणी गावासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन केली होती. त्या ठिकाणाहून पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती उपसरपंच सुरज पाटील यांनी दिली. परंतु या ठिकाणची पाईपलाईन नादुरुस्त असून ती दुरुस्त केव्हा होणार असा प्रश्‍न ग्रामस्थ करत असून आम्हाला पाणी कधी मिळणार? किती दिवस लागणार? मायणी ग्रामपंचायतीने गेल्या 12 दिवसात काय प्रयत्न केले? किती प्रयत्न केले? असे अनेक प्रश्‍न सध्या ग्रामस्थ गावामध्ये उपस्थित करत आहेत.

दोन-तीन दिवसात पाणी उपलब्ध होईल

पाणीपुरवठा करणारी मोटर जळाली असून ती दोन दिवसात दुरुस्त होईल व पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच यात्रेसाठी आलेल्या लोकांना खाजगी टॅंकरने पाणी पुरवले जाईल.
– सूरज पाटील, उपसरपंच मायणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.