सत्ताधाऱ्यांमुळे शहरात पाणीप्रश्‍न गंभीर

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची भाजपवर टीका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या वाढत्या तक्रारींवर महापालिका प्रशासन व सत्ताधारी अद्याप तोडगा काढू शकले नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बुधवारी (दि.6) केली आहे. दरम्यान शहरातील नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असा पर्याय भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सुचविला होता. त्या पर्यायाची खिल्ली उडवत कलाटे यांनी सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनावर बोट ठेवले आहे.

कलाटे महापालिकेतील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन पाणीप्रश्‍न आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनावर टीका केली. ते म्हणाले, आमदार जगताप यांनी सुचविलेला पर्याय योग्य नाही. याची कायदेशीर तपासणी करुन योग्य तो निर्णय आयुक्तांनी घ्यावा. शहरातील बांधकामे थांबवू नयेत. शहरात काही प्रमाणात लोकांना रोजगार मिळतो तो ही बंद होईल.

मुळातच देशात राज्यात व शहरात बेरोजगारांचे प्रमाण वाढलेले आहेत. ते आणखी वाढवू नये. गेल्या 15 वर्षांत नियोजन करण्यात आले नाही. त्याची जवाबदारी स्वत: भाजपाच्या शहराध्यक्षानी स्वीकारावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील बेकायदेशीर नळजोड कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येऊ नये. एका बाजूला करदाते म्हणून सहानुभूती दाखवणे व दुसऱ्या बाजूला त्यांना पाणी न देणे असे फसवे काम सत्ताधाऱ्यांच्या मागणीवरून करू नये.

अनधिकृत नळजोडधारकांना नियमित जोड घेण्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी योग्य धोरण राबविणे आवश्‍यक आहे. त्यांच्या गुन्हा दाखल न करता नळजोड नियमित करण्यासाठी चांगले धोरण पालिकेने राबवावे, अशी मागणीही कलाटे यांनी यावेळी केली. सत्ताधारी भाजप शहरातील नागरिकांवर अन्याय करण्यासाठी पोलिसांकडे गुन्हे दाखल करा म्हणून मागणी करत आहे. हे नागरिकांचे व शहराचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीकाही कलाटे यांनी यावेळी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here