मुंबई – भाजप-शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाचा वाद दिवसेंदिवस चिघळत असतानाच शिवसेना आपल्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र शिवसेनासह काँग्रेस,राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आमचे आमदार फोडण्यापेक्षा स्वतःचे सांभाळावेत, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. तसेच आमदारांच्या फोडाफोडीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, काँग्रेस राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाहीत. तसेच शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभे राहण्याची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. राज्यात जी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आमदार फोडण्याच्या घटना घडत असतात. मात्र, असे प्रकार महाराष्ट्रात घडू देणार नाही. आणि जे अशाप्रकारच्या अफवा पसरवत आहेत. त्यांनी आधी आपले आमदार सांभाळावेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
Sanjay Raut,Shiv Sena: The Chief Minister will be from Shiv Sena. https://t.co/ebV8TSny18 pic.twitter.com/HjNfeAKvrG
— ANI (@ANI) November 7, 2019
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. या गोष्टींमुळे आमच्या व्यक्तीगत संबंधात कोणतीही बाधा येणार नाही. हा राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी निगडीत आहे, असेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.